कावड यात्रेचा चेंडू गृहमंत्रालयाच्या काेर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST2021-08-18T04:24:57+5:302021-08-18T04:24:57+5:30

अकोला : कोविडच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रोत्सव साजरा करण्याबाबत शिवभक्त मंडळांनी प्रशासनाला आपल्या सूचनांचे निवेदन सादर केले. हे निवेदन जिल्हा ...

The ball of Kawad Yatra is in the court of Home Ministry | कावड यात्रेचा चेंडू गृहमंत्रालयाच्या काेर्टात

कावड यात्रेचा चेंडू गृहमंत्रालयाच्या काेर्टात

अकोला : कोविडच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रोत्सव साजरा करण्याबाबत शिवभक्त मंडळांनी प्रशासनाला आपल्या सूचनांचे निवेदन सादर केले. हे निवेदन जिल्हा प्रशासनाने स्वीकारले असून, हे निवेदन तातडीने मार्गदर्शक सूचनांसाठी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तूर्तास जिल्हा प्रशासन हे गेल्यावर्षी ज्या पद्धतीने जलाभिषेक करण्यात आला त्या पद्धतीवर कायम आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

अकाेल्यातील कावड महाेत्सव हा लाेकाेत्सव आहे. सलग दुसऱ्या वर्षी या महाेत्सवावर काेराेनाचे सावट आहे. शिवभक्तांनी यासंदर्भात शनिवारी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्यासाेबत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार मंगळवारी कावड पालखी मंडळे व जिल्हा प्रशासन यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी निमा आरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार तसेच पोलीस दलातील अधिकारी व कावड पालखी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती तसेच मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले म्हणणे प्रशासनासमोर मांडले. तसेच हा उत्सव कोविड नियमांचे पालन करून कसा पार पाडता येईल याबाबत त्यांनी केलेल्या सूचनांचे निवेदनही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. त्यानंतर हे निवदेन प्रशासनाने स्वीकारले असून, स्थानिकस्तरावर निर्णय घेणे शक्य नसल्याने हे निवेदन मंत्रालयात गृह विभागाला तत्काळ पाठविण्यात येईल. यावर मार्गदर्शन मागविण्यात येईल. कावड पालखी यात्रोत्सव साजरा करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचना मंडळांना तत्काळ कळविण्यात येतील. तूर्त, जिल्हा प्रशासन मंडळांना कोणत्याही बाबतीत आश्वस्त करीत नाही. हा उत्सव गेल्यावर्षी ज्या पद्धतीने साजरा झाला, त्या पद्धतीने साजरा व्हावा यावर प्रशासन कायम आहे, असे प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्पष्ट केले.

Web Title: The ball of Kawad Yatra is in the court of Home Ministry