बाळापूरच्या आरोपींचा मराठवाड्यात धुमाकूळ

By Admin | Updated: February 14, 2015 01:59 IST2015-02-14T01:59:52+5:302015-02-14T01:59:52+5:30

अपहरणाचा प्रयत्न, पळून जाताना दुचाकीस्वारास धडक, एक ठार

Balapur accused in Marathwada region | बाळापूरच्या आरोपींचा मराठवाड्यात धुमाकूळ

बाळापूरच्या आरोपींचा मराठवाड्यात धुमाकूळ

बुलडाणा : मराठवाड्यात एका शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील आरोपींनी शुक्रवारी भलताच धुमाकूळ घातला. या आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपींनी त्यांची कार वाट्टेल तशी पळवली. आरोपींच्या कारची धडक लागून एकाचा मृत्यू झाला असून, नागरिकांनी तिन्ही आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेसमोर इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी शेख अमिर शेख खलील (१४) उभा होता. एवढ्यात एम.एच.-२८ व्ही. २६६६ या क्रमांकाच्या इंडीकाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील दिलीप शामराव निंबाळकर (३५), मनोज रामचंद्र निंबाळकर (३५) आणि फुलंब्री तालुक्यातील निंबाळवाडी येथील निसार सनतउल्ला मुलतानी (३६) हे तिघे तिथे आले. त्यांनी अमिर शेख याच्याजवळ जावून त्याला बिस्किट दिले. तुझ्या वडीलांनी तुला बोलाविले, तु आमच्या सोबत चल, असे त्यांनी अमिर शेखला म्हटले. मेरे अब्बा तो मर गये, असे म्हणून या विद्यार्थ्याने शाळेत पळ काढून ही घटना शिक्षक शेख कादर यांना सांगीतली. घटनेची माहिती मिळताच शिक्षकांसह ग्रामस्थांनी आरोपींचा शाध सुरू केला; परंतु ग्रामस्थ येत असल्याचे पाहून आरोपींनी मिळेल त्या मार्गाने इंडीका पळवण्यास सुरूवात केली. रस्ते माहित नसल्यामुळे आरोपी शिवणा, अन्वा, जळगाव सपकाळ, हिसोडा, मादनी या मार्गाने पुन्हा अंजिठा ते बुलडाणा मार्गावर आले. तरीसुध्दा काही शिक्षकांनी दुचाकीने आरोपीच्या इंडीकाचा पाठलाग सुरूच ठेवला. अंजिठा रोडवरील बोरखेड फाट्याजवळ आरोपींच्या इंडीकाने सांगली जिल्ह्यातील बिरसू येथील चंद्रकांत एडके व सुदर्शन जाधव यांच्या एम.एच.-२० आरटी-१८८७ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात चंद्रकांत एडके जागीच ठार, तर सुदर्शन जाधव गंभीर जखमी झाला. या अपघातात इंडीका रस्त्याच्या बाजुला जावून उलटली. त्याचवेळी त्यांच्या मागावर असलेले शिक्षक व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तिन्ही आरोपींना बेदम चोप देऊन, इंडीका पेटवून दिली. ग्रामस्थांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तीन्ही आरोपींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. इंडीका व दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी सुदर्शन जाधव यास बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते; परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. अपघात प्रकरणाचा पारध पोलीस ठाण्याचे एपीआय बिडवे, तर अपहरण प्रकरणाचा तपास अजिंंठा पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिंदे हे करीत आहेत.

 

Web Title: Balapur accused in Marathwada region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.