पालकमंत्र्यांच्या धाडसत्रातील आराेपींचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:07+5:302021-07-07T04:24:07+5:30
अकाेला : पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून विविध ठिकाणी धाडसत्र करीत गुटखा जप्त केला हाेता तर बनावट राशन ...

पालकमंत्र्यांच्या धाडसत्रातील आराेपींचा जामीन अर्ज फेटाळला
अकाेला : पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून विविध ठिकाणी धाडसत्र करीत गुटखा जप्त केला हाेता तर बनावट राशन कार्ड बनविणारे, बियाणांची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यांची तपासणी केली हाेती़ या प्रकरणातील गुटखा विक्री करणाऱ्या तीन जनांना अटक करण्यात आली असून दाेन जण फरार आहेत. या आराेपींनी जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला हाेता़ जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी या आराेपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे़ पालकमंत्री बच्चू कडू यांनी पातूर येथील एका दुकानातून गुटखा खरेदी केला हाेता़ त्यानंतर या ठिकाणासह जिल्ह्यात गुटख्याची विक्री हाेत असल्याचे उघडकीस आले हाेते़ या प्रकरणी पातूर पाेलिसांनी निरंजन वासुदेव बंड रा़ पातूर, सैय्यद फैजान सैयद रसूल रा़ पातूर या दाेन आराेपींना अटक केली तर खामगाव येथील रहिवासी उमेश गिरीधारीलाल बरालीया, अकाेल्यातील सिंधी कॅम्प येथील रहिवासी कालू जेठानंद लालवाणी व रजपूतपुरा येथील रहिवासी अक्षय चमन अग्रवाल हे तीन आराेपी फरार झाले असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़ या पाचही आराेपींना जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला असता न्यायालयाने पाचही आराेपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे़ या धाडसत्रानंतर जिल्हाभर खळबळ माजली हाेती़ त्यामुळे हे बडे गुटखामाफिया फरार झाले असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़ यामधील खामगाव येथील बरालीया हा गुटख्याची काेट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या धाडसत्रानंतर समाेर आली आहे़ या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. शाम खाेटरे यांनी तर आराेपीच्या वतीने ॲड. माेहता यांनी कामकाज पाहिले़