बहिरखेड गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:34+5:302021-05-05T04:30:34+5:30
निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर नजीक असलेल्या बहिरखेड गावाने कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यात यश मिळविले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून, ग्रामस्थांच्या ...

बहिरखेड गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले !
निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर नजीक असलेल्या बहिरखेड गावाने कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यात यश मिळविले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून, ग्रामस्थांच्या एकजुटीने कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गत दीड वर्षांमध्ये गावात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही.
बहिरखेड गावाची लोकसंख्या जेमतेम साडेचारशे. गेल्या दीड वर्षांपूर्वी कोरोनाने विदर्भात एन्ट्री केली. तेव्हापासून लहानसे गाव फार सतर्क झाले. बहिरखेड गावाच्या सरपंच कविता किरण ठाकरे, ग्रामसेविका तृप्ती पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांनी निर्णय सुरुवातीला गाव बंदी केली. रस्ते बंद केले. त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन वेळा सॅनिटायझरची फवारणी केली. गावातील लोकांना बाहेरगावी जाऊ न देणे, बाहेरगावचे पाहुणे गावात येऊ न देणे यासाठी प्रयत्न केले.
कोरोनापासून दूर राहण्यासाठी बहिरखेड व आसपासच्या गावात ऑटोवर लाऊड स्पीकर लावून जनजागृती करणे, गावातील वयोवृद्ध लोकांच्या बैठकावर बंदी, गावात फिजिकल डिस्टन्सिंग, घराघरामध्ये सॅनिटायझरचा वापर आदी नियम पाळल्यामुळे एकट्या बहिरखेड गावात कोरोनाचा राक्षस गावात प्रवेश करू शकला नाही. एकजूट, आणि निर्णयात्मक क्षमता असल्यामुळे कोरोना सारखा महाभयंकर रोग बहिरखेड्यात प्रवेश करू शकला नाही. गावकरी, सरपंच कविता किरण पाटील ठाकरे, उपसरपंच दीपिका इंगोले, पोलीस पाटील नीलकंठ ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष पानूबाई राठोड, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील ठाकरे, स्वप्नील ठाकरे, मयूर घुमसे, अतुल ठाकरे, योगेश ठाकरे, विष्णू घुमसे, वैभव घुमसे, विठ्ठल घुमसे, विठ्ठल ठाकरे आदी सर्व तरुणांनी पुढाकार गावात एकजूट निर्माण केली. कोरोना विषाणूची भीषणता सर्वांसमोर मांडली. यासाठी गावकऱ्यांना पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेवराव पडघान, बिट जमादार राजू वानखडे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे आदींचे सहकार्य लाभले.
फोटो: