अकोल्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्ड अभियान प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:33 IST2019-06-24T14:33:39+5:302019-06-24T14:33:46+5:30
अकोला : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्यमान भारत’ ई-कार्ड नोंदणीला सोमवार, २४ जूनपासून अकोल्यात प्रारंभ होत आहे.

अकोल्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्ड अभियान प्रारंभ
अकोला : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्यमान भारत’ ई-कार्ड नोंदणीला सोमवार, २४ जूनपासून अकोल्यात प्रारंभ होत आहे. योजनेंतर्गत कार्ड प्राप्त रुग्णांना तब्बल १ हजार २४२ आजारांवर उपचार घेणे शक्य होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात २९ जूनपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थींना जलद गतीने लाभ मिळावा, यानुषंगाने सोमवारपासून अकोल्यात ई-कार्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. २९ जूनपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींना आधार कार्ड दाखवून ई-कार्ड मिळविता येणार आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड असेल, त्यांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. यासाठी लाभार्थींना कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच जवळपासच्या सेतूवर नोंदणी करावी लागणार आहे. कार्डधारकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे ११२२ सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यता प्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयांमार्फत उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंब संख्या
ग्रामीण शहरी
१,६०,४०० - ५१,४८४
लाभार्थी कोण?
ग्रामीण
घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी सात वर्गातील कुटुंबांचा समावेश आहे.
शहरी
कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर कारागीर इत्यादी ११ वर्गातील कुटुंबांचा समावेश प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे.
बालरोग शल्यक्रियेत १५ हजारांचा फरक
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत ९७१, तर आयुष्यमान भारत योजनेत १३४९ आजारांवर उपचारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांमधील ५८१ उपचार पद्धती सारख्याच आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे पॅकेज जनआरोग्य योजनेच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी कमी आहे. विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बालरोग शल्यक्रियेचे पॅकेज ३० हजारांचे आहे, तर मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी हे पॅकेज आयुष्यमान भारत योजनेत १५ हजारांचे आहे.
२५ ते ३० टक्क्यांचा फरक
राज्यात राबविण्यात येणाºया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारणत: २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे.
जिल्ह्यात सोमवार, २४ जून ते २९ जून या कालावधीत आयुष्यमान भारत ई-कार्ड मोहीम राबविण्यात येणार आहे. गरजूंनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.