पुरस्कार जनजागृतीसाठी सार्थकी लावू!
By Admin | Updated: May 18, 2015 01:27 IST2015-05-18T01:27:44+5:302015-05-18T01:27:44+5:30
स्वच्छतेचा ध्यास घेतलेला नववधूचा निर्धार; आंदणात मिळविले होते तयार शौचालय.
_ns.jpg)
पुरस्कार जनजागृतीसाठी सार्थकी लावू!
राजेश्वर वैराळे / बैरगाव वैराळे : स्वच्छेबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे. गाव हगणदारीमुक्त होण्यासाठी सर्वच समाजघटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरस्काराच्या माध्यमातून मिळणारी काही रक्कम स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या भारत एक कदम या चळवळीच्या माध्यमातून खर्च करू, असा निर्धार आंदणात तयार (रेडिमेड) शौचालय मिळविलेल्या चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिने रविवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. लग्नात आंदण म्हणून तयार शौचालय मिळवून स्वच्छतेचा आयकॉन ठरलेल्या चंदाला सुलभ इंटरनॅशल संस्थेने पुरस्कार जाहीर केला. या पृष्ठभूमीवर चंदाने लोकमतशी रविवारी संवाद साधला. तिचे लग्न १५ मे रोजी कारंजा रमनाजपूर (नया अंदुरा) येथे झाले होते.
प्रश्न :- आंदणात तयार शौचालयाची मागणी करावी, ही प्रेरणा कोठून मिळाली?
चंदा :- अंत्री मलकापूर येथे राहत असलेले माझे नातेवाईक अरविंद देठे हे स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी भारत एक कदम ही चळवळ राबवितात. ते रेडिमेड शौचालय तयार करतात. मी त्यांच्याकडे नेहमीच जात असे. त्यामुळे माझाही या चळवळीशी संपर्क आला. माझ्या परीने मीही या चळवळीत सहभागी झाले. लग्न निश्चित झाल्यानंतर सासरी शौचालय नाही, हे मला समजले. त्यामुळे आंदणात तयार शौचालय मिळावे, यासाठी मी आग्रह धरला.
प्रश्न :- तयार शौचालयाच्या आग्रहाला प्रतिसाद कसा मिळाला ?
चंदा :- तयार शौचालयाच्या आग्रहाचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी कौतुक केले. मावसा गजानन नाडे यांनी तयार शौचालयासाठी अरविंद देठे यांच्याशी संपर्क साधला. सर्वांंच्याच पुढाकाराने मला तयार शौचालय मिळाले.
प्रश्न :- स्वच्छतेच्या संदर्भात शासनाकडून कोणती अपेक्षा आहे?
चंदा :- सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणार्या जोडप्यास शासनाकडून अनुदान देण्यात येते; मात्र आता शासनाने मुलीच्या सासरी शौचालय नसल्यास तिला तयार (रेडिमेड) शौचालय द्यावे.
प्रश्न:- आता लग्नानंतरही स्वच्छतेबाबत जागृतीसाठी प्रयत्न करणार काय?
चंदा:- हो, स्वच्छतेसाठी शासनाच्या खांद्यांला खांदा लावून समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रश्न :- स्वच्छ भारत मिशन कसे यशस्वी होईल?
चंदा :- प्रत्येक मुलीने उघड्यावर शौचाला जाणार नाही, असा निर्धार करणे गरजेचे आहे. या निर्धाराला समाजातील प्रत्येक घटकाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. असे झाल्यास संपूर्ण देश खर्या अर्थाने स्वच्छ होईल.