आकोट सूतगिरणी प्रकरणात पोलिसांची कारवाई करण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: August 25, 2014 03:14 IST2014-08-25T03:07:31+5:302014-08-25T03:14:48+5:30
आकोट सूतगिरणीतील भ्रष्टाचार प्रकरणात पोलिसांची कारवाईस टाळाटाळ, माजी आमदार कराळे यांचा आरोप.

आकोट सूतगिरणी प्रकरणात पोलिसांची कारवाई करण्यास टाळाटाळ
अकोला - आकोट सूतगिरणीतील भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माजी आमदार रामेश्वर कराळे यांनी केला आहे. वर्षभरापासून केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांच्यासह अँड. सुरेंद्र पोटे यांनी रविवारी अकोला येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला. आकोट सूतगिरणीचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर गणगणे आणि त्यांचे भाऊ प्रभाकर गणगणे यांच्यासह इतर संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. या प्रकरणात न्यायालयाने विविध गुन्ह्यात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही वर्षभरापासून पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप कराळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
या संदर्भात कराळे आणि अँड. पोटे यांनी शनिवारी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन तत्काळ करावाई करण्याची मागणी केली आहे.
*राजकीय द्वेषातून शिळ्य़ा कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न : गणगणे
आकोट सूतगिरीतील अनियमिततेबाबत झालेल्या आरोपाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रकरणात अशी जाहीर वाच्यता करणे योग्य नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय द्वेषातून आरोप केले जात आहे. हा प्रकार म्हणजे शिळ्य़ा कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे, असे माजीमंत्री सुधाकरराव गणगणे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गावंडे, मनीषा मते, भाजपचे महादेवराव बोडखे यांचाही संचालक मंडळामध्ये समावेश होता. आरोप करणारी मंडळी त्यांच्याबाबत का बोलत नाही, असा प्रतिप्रश्न उपस्थित करून आरोप करणार्यांवरही १९९४ ते १९९८ या काळात प्रशासक असताना अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरील आरोपाबाबतही न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्याबाबत कुणी का बोलत नाही, असा प्रश्न गणगणे यांनी उपस्थि केला.
*७ कोटींचा अपहार
आकोट सूतगिरणी प्रकरणात कमी दरात कच्चामाल (कापूस) खरेदी करून त्याचे दर अधिक दाखवून तत्कालिन संचालक मंडळाने प्रतिकिलो मागे ५ ते ७ रुपयांप्रमाणे एकूण ७ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केला असल्याचा आरोप कराळे यांनी केला. संचालक मंडळामध्ये सुधाकर गणगणे यांच्यासह प्रभाकर गणगणे, भाऊराव अंबाडकर, शालीग्राम अवचार, पंढरीनाथ सिरस्कार आणि पंजाबराव सिरसाट यांचा समावेश होता. तत्कालीन संचालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. १९९४-१९९५ च्या लेखा परीक्षणामध्ये ही बाब उघडकीस आली. त्यावेळी संचालक मंडळ बरखास्त करून सूतगिरणीवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते, हे विशेष.