ग्रामीण भागानेच आपलेपण जपले - अविनाश सावजी
By Admin | Updated: May 9, 2016 02:43 IST2016-05-09T02:16:03+5:302016-05-09T02:43:12+5:30
पश्चिम व-हाडातील कर्तबगार शेतक-यांना रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार प्रदान.

ग्रामीण भागानेच आपलेपण जपले - अविनाश सावजी
अकोला : श्रीमती कशाला म्हणावी? घरदार मोठं याला की हृदयाच्या श्रीमंतीला? शहरात सहा खोल्यांचं घर असूनही तिसरी व्यक्ती सहन होत नाही; परंतु ग्रामीण भागात छोट्याशा घरात दहा व्यक्ती राहत असताना आजही तोच सन्मान केला जातो. म्हणूनच ग्रामीण भागातील माणसानं, शेतकर्यांनी आजही आपलेपण जपलं आहे. हे शिकण्यासाठीच शहरी मध्यमवर्गीय युवकांनी ग्रामीण भागाशी नाळ जोडावी, असे आवाहन प्रयास या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी रविवारी येथे केले. रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्य़ात ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ अकोला, जय गजानन कृषिमित्र परिवार व अकोला जिल्हा मराठा मंडळ यांच्यावतीने रविवारी मराठा मंडळ सभागृहात आयोजित सोहळ्यात यावर्षी अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील २५ महिला-पुरुष शेतकर्यांना रोटरी दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोटरी इंटरनॅशनलचे माती प्रातंपाल डॉ. नानासाहेब चौधरी होते. व्यासपीठावर डॉ. अविनाश सावजी, डॉ. पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ, डॉ. रमेश वट्टमवार (औरगांबाद), रोटरीचे मानद सचिव सभापती शुक्ल यांची उपस्थिती होती. डॉ. सावजी यांनी प्रश्न निर्माण करण्यापेक्षा, उत्तर शोधण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात पुढे सांगितले. राज्यात दरवर्षी २00 कोटींची रद्दीची उलाढाल आहे. शहरात दररोज रद्दी जरी गोळा केली आणि विकली, तर एका-एका शहरातून लक्षावधी रुपये गोळा होतील. ती रक्कम शेतकरी, इतर सामजिक कामांसाठी वापरता येतील, असा सल्ला त्यांनी दिला.