ऑटोडीसीआर प्रणाली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:01 IST2017-08-25T01:00:53+5:302017-08-25T01:01:04+5:30
अकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

ऑटोडीसीआर प्रणाली ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
शहरात व्यावसायिक-रहिवासी इमारती असो किंवा घरे बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त ठरते. नगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. यादरम्यान, नकाशा सादर करताना प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे प्रशासनाने नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. ऑटोडीसीआर पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करणे भाग आहे. त्यासाठी मनपाने रीतसर आर्किटेक्ट,अभियंत्यांची निवड केली आहे. ऑटोडीसीआरचा कंत्राट पुणे येथील कंपनीला देण्यात आला आहे. प्रिंटर नादुरुस्त असण्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या नकाशाची कामे अधांतरी सापडली आहेत.
नगररचना विभागाचे नियंत्रण नाही!
नगररचना विभागाच्या अखत्यारित काम करणार्या संबंधित कंपनीवर नगररचना विभागाचे नियंत्रण अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येतो. केवळ एक प्रिंटर नादुरुस्त झाल्याचे कारण दर्शवित कंपनीने मागील १७ दिवसांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रिंटर नादुरुस्त झाले असेल, तर ते दुसर्याच दिवशी बदलणे अपेक्षित होते. १७ दिवसांपासून काम ठप्प असेल, तर कंपनी झोपेत असल्याचे दिसून येते. कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अकोलेकरांना होत असलेल्या मानसिक त्रासाचा कंपनीला खुलासा करावा लागेल.
-विजय अग्रवाल, महापौर