स्वयंभू महादेव व नंदीच्या दर्शनासाठी वृषभराजाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST2021-09-06T04:23:56+5:302021-09-06T04:23:56+5:30
विजय शिंदे अकोटः कधी काळी दृष्काळाशी दोन हात करणारे विदर्भात पुंडा नंदीग्राम गावात यावर्षी अधिक महत्व प्राप्त झाले ...

स्वयंभू महादेव व नंदीच्या दर्शनासाठी वृषभराजाची हजेरी
विजय शिंदे
अकोटः कधी काळी दृष्काळाशी दोन हात करणारे विदर्भात पुंडा नंदीग्राम गावात यावर्षी अधिक महत्व प्राप्त झाले असून आनंद ओसंडून वाहत आहे. ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी पोळा (पिठाेरी अमावस्या) आणि श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवार आल्यामुळे गावातील स्वयंभू महादेव व नंदीच्या दर्शनाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे स्वयंभू महादेव व नंदीच्या दर्शनासाठी वृषभराजा हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे ४० एकरांतील तलाव पाण्याने तुडुंब भरल्याने बोटिंगची हौस भागविली जात आहे.
खारपाणपट्ट्यात पाण्याचा दुष्काळ जाणवत असल्याने पुरातन ४० एकरांमध्ये असलेल्या तलावातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागविली जात होती. पाऊस किती पडला, याचे मोजमाप करणारे तालुक्यातील पहिले पर्जन्यमापक यंत्र पुंडा नंदीग्राम येथे बसवण्यात आले आहे. दुष्काळी झळा सोसत हा तलाव कोरडा पडला होता. दरम्यान, गावात नळयोजना आली, परंतु यावर्षी तलाव तुडुंब भरला आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर मच्छी उत्पादन झाले, तर ग्रामपंचायतीला या तलावातील मच्छी विक्रीमधून ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी पोळानिमित्ताने गावात आलेल्यांची मच्छीमाराच्या बोटिंगमध्ये बसून आनंद घेत आहेत. गावात मोठ्या उत्साहात श्रावणासह सर्व उत्सव पार पडतात, परंतु यावर्षी श्रावणातील शेवटचा पाचवा सोमवार व पोळा एकाच दिवशी असल्याने दर्शनाचा मोठा योग जुळवून आला आहे. बाहेरगावी राहत असलेले अनेक जण गावी परतले आहेत.
-----------------------------
पोळा साधेपणाने होणार साजरा
पुरातनकाळापासून या नंदीग्राममध्ये पोळा उत्साहात साजरा केला जातो. परिसरातील अनेक गावांमधील बैलांची जोडी स्वयंभू नंदीच्या दर्शनासाठी आणतात. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा न भरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळत घरातच साधेपणाने पोळा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
-----------
यावर्षी पोळा आणि श्रावणातील शेवटचा सोमवार एकाच दिवशी आला आहे. महादेव पिंड व नंदीच्या दर्शनासोबतच गावात आल्यानंतर तलावावरील बोटिंगमध्ये बसल्यावर गावात आल्याचा आनंद वाटत आहे.
-विजय बिहाडे, प्राचार्य, नंदीग्राम पुंडा