श्रीलंकेला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला बंगळुरू विमानतळावर अटक
By आशीष गावंडे | Updated: March 7, 2025 22:32 IST2025-03-07T22:32:35+5:302025-03-07T22:32:55+5:30
ऑनलाइन सट्टा प्रकरण; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

श्रीलंकेला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला बंगळुरू विमानतळावर अटक
आशिष गावंडे, अकोला: श्रीलंकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑनलाइन सट्टा प्रकरणातील फरार आराेपी महेश बाबाराव डिक्कर (रा.लाेहारी खुर्द ता.अकाेट जि. अकोला) याला ६ मार्च राेजी बंगळूरु विमानतळावरुन अटक करण्याची कारवाइ अकाेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. आराेपीविराेधात पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लूक आऊट नाेटीस’जारी केली हाेती. यामुळे आराेपीला बेड्या ठाेकण्यात मदत झाली.
ऑनलाइन सट्टा खेळविणाऱ्या एका आंतरराज्यीय टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला हाेता. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांनी गोपनीय माहितीच्या आधारे बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कातखेड शिवारातील एक फार्म हाऊसवर छापा मारला हाेता. याठिकाणी ऑनलाईन सट्टा चालवला जात होता, ज्यामध्ये मोबाईल,लॅपटॉप व इतर अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी फरार महेश बाबाराव डिक्कर व मोनीश गुप्ता या दोन मुख्य आरोपींवर लक्ष केंद्रित केले. दरम्यान,बंगळूरू विमानतळावरुन आरोपीला अटक करून शुक्रवार ७ मार्च राेजी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १० मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार माेनिष गुप्ताचा पाेलिस कसून शाेध घेत आहेत.
आराेपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
पाेलिस तपासात हे उघडकीस आले की, महेश डिक्कर हा दुबईमध्ये ऑनलाइन सट्ट्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता.आराेपींचे दुबइ, श्रीलंका असे आंतरराष्ट्रीय कनेक्शन लक्षात घेता दाेन्ही फरार आराेपी विदेशात पळून जाऊ शकतात,अशी शक्यता असल्याने पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी लूक आऊट नाेटीस जारी केली हाेती. जिल्ह्याच्या इतिहासात अशी नाेटीस पहिल्यांदाच जारी करण्यात आली.
लुक आऊट सर्क्युलरमुळे बेड्या
या प्रकरणातील फरार आराेपी महेश डिक्कर, माेनिष गुप्ता यांच्याविराेधात लुक आऊट सर्क्युलर जारी केल्यामुळे डिक्कर याला बंगळूरु विमानतळ प्रशासनाने ताब्यात घेतले. विमानतळ प्रशासनाने अकोला पोलिसांशी संपर्क साधला असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक गाेपाल जाधव, अंमलदार अब्दुल माजीद यांना तातडीने बंगळूरू येथे रवाना करण्यात आले.