अकोल्यात महावितरणच्या वसुली पथकावर जमावाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:40 IST2018-03-29T14:39:34+5:302018-03-29T14:40:49+5:30
अकोला: जुने शहरातील अगरवेस येथे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर अगरवेस येथील सात-आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

अकोल्यात महावितरणच्या वसुली पथकावर जमावाचा हल्ला
अकोला: जुने शहरातील अगरवेस येथे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर अगरवेस येथील सात-आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी सात जणांविरुद्ध दंगलीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अगरवेस येथील रहिवासी नसिरोद्दीन कदिरोेद्दीन याच्याकडे असलेले ६ हजार ११० रुपयांचे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीचे एक पथक मंगळवारी गेले होते; मात्र सदर वीज ग्राहकाने बुधवारी पैसे देणार असल्याचे सांगितल्याने हे पथक बुधवारी पुन्हा गेले. या पथकामध्ये अभियंता कपिल वाकोडे, लिपिक विकास कोकाटे, विलास देशमुख, बाळू आडे, अजय बेलखेडे, ललीत पाचपोर, उमेश झटाले व अतुल ढेंगे हे अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यांनी नसिरोद्दीन कदिरोेद्दीन यांना थकीत वीज देयकाची मागणी केली असता त्याची मुले अझहर व फैजान या दोघांनी पाच ते सहा गुंडप्रवृत्तीच्या युवकांना बोलावून या पथकावर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये अभियंता कपिल वाकोडे व बाळू आडे यांच्यासह पथकातील कर्मचाºयांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या अधिकारी व कर्मचाºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कपिल वाकोडे यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी या अझहर नासिरोद्दीन, फैजान नासिरोद्दीन व मोहम्मद इम्रानसह सात जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, ३३२, ३५३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.