प्रेमविवाहाच्या वादातून युवकावर हल्ला
By Admin | Updated: February 11, 2015 01:22 IST2015-02-11T01:22:13+5:302015-02-11T01:22:13+5:30
अकोल्यातील घटना; गुन्हा दाखल.

प्रेमविवाहाच्या वादातून युवकावर हल्ला
अकोला: अज्ञात आरोपींनी देशमुख फैलात राहणारा आनंद चंदू गयले (२२) याच्यावर फावड्याने जबर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील रस्त्यावर घडली. जखमी युवकाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आनंदवर झालेला हल्ला, प्रेमविवाहाच्या वादातून झाल्याचे बोलले जाते.
देशमुख फैलामध्ये राहणारा आनंद गयले हा युवक रामदासपेठेतील डॉ. दीपक केळकर यांच्या रुग्णालयामध्ये सहा वर्षांंपासून वॉर्डबॉय म्हणून काम करतो. आनंद हा मोटारसायकलने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरून जात असताना, त्याला चार ते पाच युवकांनी अडवून त्याचेवर फावड्याने जबर वार केले आणि आरोपी पळून गेले. यात आनंद हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, त्याचेवर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, रामदासपेठचे पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांनी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आनंदवर झालेला हल्ला हा प्रेमविवाहातून तर झालेला नाही ना, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी उशिरा रात्री अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.