साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारताना गजाआड
By Admin | Updated: December 23, 2014 00:49 IST2014-12-23T00:49:41+5:302014-12-23T00:49:41+5:30
१९५00 रुपयांच्या लाचेची रक्कम केली गायब.

साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारताना गजाआड
अकोला: अपघातातील जप्त केलेला ट्रक सुपूर्दनाम्यावर सोडविण्यास न्यायालयात सकारात्मक पोलीस अहवाल सादर करण्यासाठी २0 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बाळापूर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
१६ नोव्हेंबर रोजी एमएच ३१ सीक्यू ७६७९ क्रमांकाचा ट्रक गुजरातवरून रसायनाचे ड्रम भरून नागपूरकडे जात असता, ट्रकचा पारसजवळील अंबुजा ऑइल फॅक्टरीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचालक राहुल उत्तम वाघमारे (रा. नागपूर) हा गंभीर जखमी झाला होता. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास एपीआय एकनाथ ढोबळे यांच्याकडे दिला. पोलिसांनी ट्रक जप्त केला. नागपूरच्या ट्रकमालकाने ट्रक सुपूर्दनाम्यावर सोडविण्यासाठी एपीआय ढोबळे यांना विनंती केली; परंतु ढोबळे यांनी न्यायालयामध्ये पोलीस अहवाल पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. ८ डिसेंबर रोजी ट्रकमालक व एपीआय ढोबळे यांच्यात १३ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली आणि ट्रक सोडून दिला. काही दिवसांनंतर ट्रकचालक राहुल वाघमारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एपीआय ढोबळे यांनी ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आणि नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात ट्रक पुन्हा जप्त केला. त्यानंतर एपीआय ढोबळे यांनी ट्रकमालकाडे ट्रक सोडण्यासाठी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. दोघांमध्ये १७ हजार रुपयांची तडजोड झाली. दरम्यान, ट्रकमालकाने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर पोलीस ठाण्यात सापळा रचला. ट्रकमालक बाळापूर पोलीस ठाण्यात १७ हजार रुपये घेऊन गेले असता, एपीआय ढोबळे यांनी त्याला २0 हजार रुपयांचीच मागणी केल्याने ट्रकमालकाने २0 हजार रुपये दिले. दबा धरून बसलेले एसीबीचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलीस निरीक्षक मनीष मोहोड, सुनील राऊत, सुनील धामोडे, संतोष दहीहांडे यांनी ढोबळे यांना अटक केली.