अशोक चव्हाण आज अकोल्यात
By Admin | Updated: November 19, 2014 02:06 IST2014-11-19T02:06:15+5:302014-11-19T02:06:15+5:30
काँग्रेसमध्ये धुसफूस; अकोला जिल्ह्यात कॉँग्रेस नेत्यांपुढे पक्षबांधणीचे आव्हान.

अशोक चव्हाण आज अकोल्यात
अकोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण बुधवारी प्रथमच अकोल्यात येत आहेत. त्यांच्या दौर्यात कॉँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी जिल्ह्यात कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अकोला पश्चिम मतदारसंघात उमेदवारीवरून ह्यपॅनलह्णच तयार करण्यात आले होते. उमेदवारी न मिळाल्याने अकोला पश्चिममध्ये पक्षांतर झाले, तर काहींनी पदाचे राजीनामे दिले. आकोट मतदारसंघात प्रचारासाठी अकोल्यातील पदाधिकारी आयात करावे लागले. अकोला पश्चिममध्ये तर १0 आजी-माजी पदाधिकार्यांवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. निवडणुकीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर आणि आकोट या पाचही मतदारसंघांमध्ये कॉँग्रेसचा पराभव झाला होता. दरम्यान, बुधवारी इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अकोल्यात येत आहेत. दुपारी १ वाजता स्वराज्य भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजी-माजी आमदार, पदाधिकारी, विविध सेलचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमातच काही पदाधिकारी निवडणुकीतील कामगिरी, गटतटावरून आपली नाराजी चव्हाणांपुढे व्यक्त करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये १0 पदाधिकार्यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर राजीनाम्याचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर दोन पदाधिकार्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले होते. काही पदाधिकार्यांनी तर पक्षाच्या बैठकीतच स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर उदय देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत देत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. आता पक्षबांधणी करताना जिल्ह्यातील कॉँग्रेस नेते अंसुतष्ट आणि पक्षापासून दूर गेलेल्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील की नाही, हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.