अकाेल्यात घरफाेडी करणारे उत्तर प्रदेशातील आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:16+5:302021-02-05T06:17:16+5:30
अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गीतानगरमध्ये घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन आराेपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

अकाेल्यात घरफाेडी करणारे उत्तर प्रदेशातील आराेपी अटकेत
अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गीतानगरमध्ये घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन आराेपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. या तीन आराेपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सहा लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आराेपींना न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाेलीस काेठडी सुनावली.
गीतानगरातील भारतीय भवनजवळील रहिवासी लखन संतोष शर्मा, खुशाल दिलीपराव नेमाडे व आशीष मनोहर यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. १८ नोव्हेंबर २०२० रोजी एकाच दिवशी चोरट्यांनी घरातील लॉकर तोडून त्यामधील सोन्याचांदीचे दागिने व नगदी असा एकूण एक लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्ष शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील आरोपी हे उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक पीएसआय सागर हटवार यांच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेश येथे गेले होते. पोलिसांनी मो. रशीद ऊर्फ मुन्ना मोहम्मद साहिल, वय २३, रा. आवाज विकास कॉलनी, हापुड उत्तर प्रदेश, शान ऊर्फ शानू मोहम्मद सलीम, वय ३० वर्ष, रा. कांदला, जि. मुजफ्फरनगर व मोहम्मद मोहसीन ऊर्फ काला मोहम्मद सगीर, वय २३ वर्षे, रा. हापुड उत्तर प्रदेश यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचांदीचे दागिने, १ लाख ११ हजार ७८७ रुपये, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सहा लाख ११ हजार ७८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.