अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम चौक येथे देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्यास पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
विवाहिता मुलासह बेपत्ता
अकोला : भगतवाडी माहेर असलेल्या तसेच कारंजा लाड सासर असलेली एक विवाहिता तिच्या तीन वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
रणपिसेनगर रोडवर वाहतूक विस्कळीत
अकोला : सिविल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन येथील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कौलखेड चौकात अतिक्रमण वाढले
अकोला : कौलखेड चौकात भाजीपाला विक्रेते तसेच फळविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने याठिकाणी अपघातात वाढ होत आहे. रस्ता नव्याने निर्माण करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहनांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या रोडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
खासगी कोविड सेंटरमध्ये लूट
अकोला : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खासगी कोविड सेंटरमध्ये आर्थिक लूट करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांना एकच देयक दोन दोन वेळा लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडले
अकोला : कोट्यवधी रुपये खर्चून शहरात नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील रस्ता तसेच सिव्हिल लाईन्स समोरील रस्त्यावर खड्डे पडले असून सिमेंट रस्त्यातील लोहा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेखाली आल्याने इसमाचा मृत्यू
अकोला : अकोला गायगाव रेल्वे रुळावर जुने शहरातील एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
रेल्वेस्टेशन चौकातील बसथांबा रद्द करावा
अकोला : शहरातून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बसेस रेल्वेस्टेशन चौकात थांबत असल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याने या ठिकाणच्या बसथांबा रद्द करावा, अशी मागणी काही वकिलांनी केली आहे.
रतनलाल प्लॉट चौकात अपघात
अकोला : रतनलाल प्लॉट चौकात अमोरासमोर आलेल्या दोन दुचाकीमध्ये अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात एकास किरकोळ मार लागला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोघांनीही सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले मात्र आपसात प्रकरण मिटविण्यात आले.