थकबाकी ४३२ कोटींवर; वसुलीसाठी महावितरणची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 18:51 IST2021-06-16T18:51:31+5:302021-06-16T18:51:46+5:30
MSEDCL News : वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

थकबाकी ४३२ कोटींवर; वसुलीसाठी महावितरणची मोहीम
अकोला : अकोला परिमंडलातील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे वाढलेली ४३२ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी शंभर टक्के वसूल करण्यासाठी परिमंडल स्तरावर व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरण वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बांधिल असली तरी वीजग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा करायला हवा. परंतु तसे होताना दिसत नसल्याने महावितरणला नाइलाजास्तव वसुलीसाठी मोहीम राबवावी लागते. थकबाकी प्रचंड वाढल्याने वसुली मोहिमेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. एवढेच नाही तर वसुली मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याने या मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे.
अशी आहे थकबाकी
अकोला परिमंडलांतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे ४३२.३९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अकोला जिल्ह्याला १६२.९७ कोटीचे, बुलडाणा जिल्ह्याला १९३.५५ आणि वाशिम जिल्ह्याला ७५.७९ रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे वीजग्राहकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता वसुलीसाठीही कंबर कसली आहे.