उमेदवारांची लगबग; बैठकांना ऊत
By Admin | Updated: October 1, 2014 01:24 IST2014-10-01T01:21:26+5:302014-10-01T01:24:54+5:30
अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक.

उमेदवारांची लगबग; बैठकांना ऊत
आशिष गावंडे / संतोष येलकर
अकोला- जिल्ह्यात विधानसभेची पहिल्यांदाच पंचरंगी लढत होत असल्यामुळे निवडणूक रिंगणातील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारासाठी अवघ्या तेरा दिवसांचा अवधी मिळत असल्याने वेळ न दवडता उमेदवारांनी घरोघरी जाऊन बैठकांना सुरुवात केल्याचे चित्र आहे. आजपर्यंत कधीही विचारपूस न झालेल्या कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करण्यासोबतच नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत.
राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप, शिवसेनेच्यावतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जात असल्याने आजपर्यंत गळ्य़ात गळे घालून एकमेकांसाठी मतांचा जोगवा मागणार्या उमेदवारांची प्रचंड कोंडी झाली आहे. युती असो वा आघाडी, जाहीर कार्यक्रमांमध्ये सहकार्यांना कोपरखळी मारून जनतेचे मनोरंजन करणारेच आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात दंड थोपटून आहेत. साहजिकच, संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांंनादेखील पेच पडला असून, आजवर ज्या उमेदवारांसाठी खांद्यावर झेंडा घेऊन राजकीय वातावरण निर्मिती केली, त्याच उमेदवाराच्या विरोधात आवाज काढावा लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत सापडलेले कार्यकर्ते सैरावरा झाल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व बाबींची जाण निवडणूक रिंगणातील उमेदवारांना असल्याने कार्यकर्त्यांची समजूत घालताना, त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे. ह्यत्याह्ण उमेदवारापेक्षा मीच कसा तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवून विकास कामांना गती देऊ शकतो, अशा स्वरूपाच्या आश्वासनांची खैरात केल्या जात आहे. १ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, १३ ऑक्टोबरपर्यंंत प्रचार करण्याचा अवधी राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. प्रचाराचा अल्प कालावधी लक्षात घेता व अद्यापी जाहीर सभांना सुरुवात न झाल्यामुळे उमेदवारांनी घरोघरी जाऊन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.