कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
By Admin | Updated: January 22, 2015 00:52 IST2015-01-22T00:52:41+5:302015-01-22T00:52:41+5:30
राज्यपाल नामनिर्देशित आमदार सदस्य कायम.

कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केल्या असून, नव्याने या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याने सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सदस्यपद मिळविण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र आहे.
राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पररभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर आणि डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी हे चार कृषी विद्यापीठ असून, कृषी विद्यापीठाचे धोरणात्मक निर्णय, अर्थसंकल्प, पदभरतीचे निर्णय आदीसर्वच धोरणात्मक बाबींवर कार्यकारी परिषदेची संमती आवश्यक असते. या कार्यकारी परिषदेवर शासकीय आणि अशासकीय मिळून २२ सदस्य असतात. यामध्ये या परिषदेचे अध्यक्ष कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव हे पदसिध्द सचिव असतात तसेच राज्यपाल नामनिर्देशीत तीन विधानसभा तर दोन विधान परिषद सदस्य आणि एक कृषी शास्त्रज्ञ गटातील सदस्याचा समावेश असतो. उर्वरित शासकीय सदस्य असतात. अशासकीय सदस्यांमध्ये चार प्रगतीशिल शेतकरी,दोन स्थानिक स्वराज्य संस्था आणि एक उद्योजक यांची निवड केली जाते. राज्याचे कृषीमंत्री हे कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती असल्याने अशासकीस सदस्यांची निवड कृषीमंत्री करतात. या सर्व अशासकीय सदस्यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली असून, काँग्रेस आघाडी सरकारने नियु्क्त केलेल्या नेमणुकीला दणका दिला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव ज्ञानेश्वर भारती यांनी कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांची निवड रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्याचे स्पष्ट क रून राज्यपाल नामनिर्देशीत सदस्य कायम असून, नुकतीच या सदस्यांच्या उपस्थितीत कार्यकारी परिषदेची सभा घेण्यात आली असल्याचे सांगीतले.
*राज्यपाल नामनिर्देशित सदस्य कायम
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कार्यकारी परिषदेवरील अशासकीय सदस्यांची झालेली निवड रद्द केल्याचे शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. या कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित विद्यमान विधान परिषद सदस्य गोपिकीशन बाजोरीया आणि अमरीश पटेल यांच्यासह शास्त्रगटातील डॉ. जयंत देसाई सदस्य कायम आहेत.