अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:24 IST2022-01-10T19:22:52+5:302022-01-10T19:24:29+5:30
CoronaVirus in Akola : सोमवारी अकोला शहरातील बैदपुरा भागातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असून, सोमवारी (दि. १०) शहरातील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११४३वर गेला आहे. दरम्यान, आणखी ५७ नवे रुग्ण आढळून आले तर दोघांनी कोरोनावर मात केली.
कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी अकोला शहरातील बैदपुरा भागातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या २२१ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये अकोला शहरातील ३५, अकोला ग्रामीण भागातील ३, बाळापूर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेतही दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर ४७७ रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. गृहविलगीकरणात असलेल्या दोघांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाबही सोमवारी समोर आली.