आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By Admin | Updated: February 23, 2015 01:50 IST2015-02-23T01:50:32+5:302015-02-23T01:50:32+5:30
अकोल्यात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण पॉझिटिव्ह.

आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
अकोला - राज्यभर खळबळ माजविणार्या स्वाइन फ्लूचे अकोल्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गत दोन दिवसांपासून दररोज एक ते दोन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत असून, रविवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात झाली असून, संशयित रुग्णांची संख्याही सात झाली आहे.
सर्वप्रथम वैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षाला असलेला सुरेश सिंह आणि वाशिम येथील रहिवासी अरुणा रामप्रकाश अवचार हे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी कमरुनिसा शेख व खांबोरा येथील रहिवासी गीताबाई पांडुरंग खडसान या दोन महिलांनाही स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी सम्यक गौतम गवई हा ३ वर्षीय मुलगा आणि २८ वर्षीय वीणा उमेश पवार या दोघांना स्वाइन फ्लू झाला असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. मनोरमा कवर (रा. वाशिम) या महिलेचा स्वाइन फ्लू तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. यासोबतच मसरत शेख नसीब शेख रा. गंगानगर व मूर्तिजापूर येथील रहिवासी सचिन धांडे हे दोघे स्वाइन फ्लू संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू संशयित म्हणून श्रावणी अशोक बायस्कर, रेशमा नीलेश राठोड, मनकर्णा शालीग्राम रोहणकार, ऋतिका किशोर धुरंधर, स्वप्निल यशवंत इंगळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय वैैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात आतापर्यंत एकूण सात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, सातच संशयित रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.