तातडीची मदत जाहीर करा
By Admin | Updated: November 16, 2014 00:52 IST2014-11-16T00:52:36+5:302014-11-16T00:52:36+5:30
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा: उत्पन्न घटल्याने शेतकरी संकटात

तातडीची मदत जाहीर करा
अकोला: सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, आणेवारी ५0 टक्क्याच्या आत जाहीर करा आणि भारनियमन तातडीने बंद करा, अशा मागण्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतमालाचे उत्पादन घटले. सोयाबीनचेही उत्पादन प्रचंड घटले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस कमी झाल्याने तुरीचे पीकही घटले. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र पीकच नसल्याने शेतकर्यांना कर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे बॅँकांनी कर्ज वसुली थांबवावी, शेतसारा माफ करण्यात यावा, अशा मागण्या शिवसेनेने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या.