व्यापक समाजहितासाठी अंनिसचे काम सुरूच राहणार
By Admin | Updated: October 15, 2014 00:18 IST2014-10-14T23:16:25+5:302014-10-15T00:18:44+5:30
लोकमत मुलाखतीत हमीद व मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केला निर्धार.

व्यापक समाजहितासाठी अंनिसचे काम सुरूच राहणार
विवेक चांदूरकर/ अकोला
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम थांबलेले नाही किंवा कामाची गतीही कमी झाली नाही. व्यापक समाजहित डोळय़ासमोर ठेवून संघटनेचे काम सुरूच राहणार असल्याचे मत डॉ. दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद व मुलगी अँड. मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.
अकोला येथील मराठा मंडळ सभागृहात अनिसच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मुक्ता व हमीद दाभोलकर आले होते. खास लोकमतशी बोलताना त्यांनी स्वत:च्या व संघटनेच्या भावी वाटचालीबद्दल माहिती दिली.
प्रश्न: डॉ. दाभोलकर गेल्यानंतर संघटनेत काय बदल झाला?
उत्तर: डॉक्टर गेल्यानंतर काम थांबलेलं नाही. तो हल्ला त्यांच्या शरीरावर नव्हे, विचारांवर होता. कार्यकर्ते खचलेले नसून, खंबीर आहेत. आणखी जोमाने काम करीत आहेत. हल्लेखोरांच्या गोळ्यांना आम्ही अंधश्रद्धा मिटविण्याच्या निर्धाराने उत्तर देणार आहे.
प्रश्न: अंनिस सध्या पर्यावरण रक्षण, जात पंचायतवर काम करीत आहे. संघटना मूळ मुद्यापासून भरकटल्यासारखे वाटत नाही का?
उत्तर : संघटना भरकटली नाही. डॉक्टर दाभोलकरांनी गणेश मुर्त्यांच्या विसर्जनातून होणार्या प्रदुषणावर चिंता व्यक्त केली होती. फटाके फोडण्यामुळे प्रदुषण होते, बालमजुरीस प्रोत्साहन मिळते. तसेच जात पंचायतीमुळे अनेकांवर अन्याय होतो. हा अन्याय दूर करणे, समाजातील उणीवा दूर करून व्यापक समाजहीत जोपासणे, हेच आमचे ध्येय आहे.
प्रश्न: अंधश्रद्धा निर्मुलनासाठी वडिलांनी आयुष्य खर्ची घातले, तुम्हीही हाच विडा उचलला आहे, स्वत:च्या करिअरकडे दुर्लक्ष होत आहे का?
उत्तर: आम्ही आमचे करिअर सांभाळून सामाजिक कार्य करीत आहे. आमच्या वडिलांनीही आम्हाला हीच शिकवण दिली. पूर्णवेळ काम करणारे लोक कायमस्वरूपी नसतात. आपले काम सांभाळून अंनिसचे काम करणारे अनेक कार्यकर्ते संघटनेत आहेत. ते चांगल्याप्रकारे काम करीत आहेत.
प्रश्न: वडिलांच्या बलिदानानंतर लागू झालेल्या अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा किती फायदा होईल?
उत्तर : या कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. आतापर्यंत शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. काहींवर कारवाईही झाली आहे. आम्ही नरबळीची सहा प्रकरणे उधळली. आता महिलांचे लैंगिक शोषण करणे, हा गुन्हा असून, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.
प्रश्न: तथागत गौतम बुद्धाच्या काळापासून परिवर्तनवादी चळवळ सुरू आहे आणि तेवढय़ाच जोरात अंधश्रद्धाही जोपासली जात आहे?
उत्तर: शतकानुशतकापासून अनिष्ठ रूढी, परंपरांचा पगडा लोकांच्या डोक्यावर आहे. निरक्षरता, गरीबीही बुवाबाजीकडे वळण्याचे कारण आहे. ही दीर्घकालीन लढाई आहे. वेळ लागेल, मात्र, विजय विवेकाचाच होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
प्रश्न: दुरचित्रवाणीवरील मालिकांमधून अंधश्रद्धा पसरविण्यात येते. काही अभिनेते अंधश्रद्धा पसरविणारे गळ्यातील ताईत, घरातील संकटे दूर करणार्या वस्तूंची विक्री करतात. आता तर संगणकाद्वारे जन्मकुंडली बनविली जाते?
उत्तर : बुवाबाजी पसरविण्यासाठी आधूनिक यंत्रांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. दुरचित्रवाणीवरील मालिकांमधून अंधश्रद्धा पसरविणार्या मालिकांवर बंदी आणण्याची मागणी आम्ही केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडे केली. शेकडो निवेदने दिली. त्याची दखल घेत मंत्रालयाने टिव्हीवर विक्री करण्यात येणार्या अंधश्रद्धा पसरविणार्या वस्तूंबद्दल आक्षेप असल्यास तक्रार करण्याचा अधिकार दिला असून, मोबाईल क्रमांकही टिव्हीवरच दाखविण्यात येतो.