अंगणवाडी सेविकांची होरपळ सुरूच
By Admin | Updated: May 15, 2015 23:35 IST2015-05-15T23:35:57+5:302015-05-15T23:35:57+5:30
राज्यात ३0 मे रोजी विविध आंदोलन; एका वर्षापासून वाढीव मानधन नाही.

अंगणवाडी सेविकांची होरपळ सुरूच
हर्षनंदन वाघ / बुलडाणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे मागील एका वर्षापासून वाढिव मानधन मिळाले नसल्यामुळे राज्या तील २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतीसांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा दाद मिळत नसल्याने अखेर या महिलांनी ३0 मे रोजी राज्यभरात सिटूच्या नेतृत्वात विविध आंदोलने करणार आहे. राज्यात २ लाख १0 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिस ग्रामीण व शहरी भागात बालाकांना संस्काराचे धडे देतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. बुलडाणा जिल्ह्यात ५ हजार सेविका आणि २ हजार ५00 मदतनीस आहेत. यासर्व कर्मचार्यांचे मागील एका वर्षापासून पासून शासनाने मानधन दिले नाही. त्यामुळे या महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेवीका आणि मदतनिस यांनी संघटनेच्या माध्यमातून बुलडाण्यापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंंत अनेक आंदोलने केली त तथापि सरकारने दाद दिली नाही. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या अंगणवाडी सेविकांनी मार्च महिन्यात असहकार आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्यांं महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंढे यांच्यातर्फे वाढीव मानधनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र एका महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर कोणत्याच प्रकारची हालचाल न झाल्यामुळे पुन्हा अंगणवाडी सेविका व मतदनीस यांनी सिटूच्या नेतृत्वात ३0 मे रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.