अकोला : महापालिकेतील नगर रचना विभाग व उपविभागीय कार्यालयातून तयार करण्यात आलेल्या बनावट गुंठेवारीच्या प्रस्ताव प्रकरणी मनपाने उपविभागीय कार्यालयाला प्रस्तावाची विचारणा करणारे साधे पत्रही न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाला जाग आली असून, नगर रचना विभागाने उपविभागीय कार्यालयाला पत्र देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.वाशिम बायपास परिसरातील शेत सर्व्हे नं.४२/१ मधील तीन एकर जागेचे बनावट गुंठेवारी प्रकरण उघडकीस येताच मनपा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. नगर रचना विभागात बनावट प्रस्ताव सादर करून तो परस्पर तयार करण्यात आला. पूर्वाश्रमीच्या शेतमालक पुष्पाबाई वसंतराव औतकरतर्फे गोविंद शंकरलाल बजाज यांच्या नावाने गुंठेवारीचा प्रस्ताव तयार झाला. यामध्ये महापालिका प्रशासनासह उपविभागीय कार्यालयातून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. ही बाब गंभीरतेने घेत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सौ. औतकर यांच्यासह गोविंद बजाज यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला. यादरम्यान, मनपामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो उपविभागीय कार्यालयातूनदेखील मंजूर झाल्याने मनपाने यासंदर्भात उपविभागीय कार्यालयाला पत्र देऊन खुलासा मागवणे क्रमप्राप्त होते; परंतु प्रशासनाने असे कोणतेही पत्र उपविभागीय कार्यालयाला दिलेच नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटताच, प्रशासनाला जाग आली. याविषयी पत्र देण्याची तयारी मनपाने सुरू केल्याची माहिती आहे.
अन् महापालिकेला जाग आली
By admin | Updated: May 13, 2014 22:11 IST