...अन् धावत्या रेल्वेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी वाचविले वृद्धेचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:01 PM2020-02-11T12:01:28+5:302020-02-11T12:01:50+5:30

क्षणाचाही विलंब न करता मेडिकलच्या तीन विद्यार्थ्यांनी वृद्धेला सीपीआर देत तिचे प्राण वाचवले.

... And medical students save old age women life in the running train | ...अन् धावत्या रेल्वेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी वाचविले वृद्धेचे प्राण!

...अन् धावत्या रेल्वेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी वाचविले वृद्धेचे प्राण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ असाच काहीसा प्रसंग सोमवारी अमरावती-सुरत एक्स्प्रेसमधील एका ७० वर्षीय वृद्ध महिला प्रवाशासोबत घडला. अमरावतीवरून निघालेल्या सुरत एक्स्प्रेसमध्ये अचानक या वृद्ध महिलेच्या हृदयाचे ठोके बंद पडले अन् एकच गोंधळ निर्माण झाला. तेवढ्यात क्षणाचाही विलंब न करता मेडिकलच्या तीन विद्यार्थ्यांनी वृद्धेला सीपीआर देत तिचे प्राण वाचवले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकत असलेले मिलिंद घोरापुरे, सदानंद चेके आणि चंदन चव्हाण हे तिन्ही विद्यार्थी सोमवारी सकाळी सुरत एक्स्प्रेसने अमरावतीहून अकोल्यासाठी निघाले होते.
बडनेरा रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर रेल्वेतील ७० वर्षीय वृद्ध प्रवासी महिला तिच्या आसनावरून अचानक कोसळली. सुमन असे त्या महिलेचे नाव आहे. धावत्या रेल्वेत घडलेल्या या घटनेमुळे इतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बघ्यांची गर्दी दिसताच तिन्ही तरुणांनी आपण वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा परिचय देत महिलेला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
मिलिंद घारापुरे या विद्यार्थ्याने महिलेला उचलून रेल्वेतील आसनावर झोपविले अन् तिच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर) हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिन्ही विद्यार्थ्यांनी सीपीआरचा वेग वाढविला.
दरम्यान, सदानंद चेके या विद्यार्थ्याने तोंडाद्वारे वृद्धेला श्वास भरण्यास सुरुवात केली. तर चंदन चव्हाण या विद्यार्थ्याने महिलेचे पाय चोळण्यास सुरुवात केली. जवळपास १० ते १५ वेळा ही प्रक्रिया केल्यानंतर वृद्ध महिलेने हुंदका देत श्वास घेण्यास सुरुवात केली. महिलेच्या हृदयाची धडधडही सुरू झाली. अकोल्यात पोहोचताच वृद्ध महिलेच्या नातेवाइकांनी महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.

‘जीएमसी’तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालायच्या तिन्ही भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडत वृद्ध महिलेचे प्राण वाचविले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करत अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार सिरसाम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख आदींनी त्यांचा गौरव केला.


प्रवासादरम्यान वृद्ध महिलेचे हृदय, फुप्फुस आणि नाडी बंद झालेली आम्हाला आढळली. अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ उपचार सुरू होणे आवश्यक असतात. म्हणून आम्ही सीपीआरचा अवलंब केला. सदानंद, चंदन आणि मी आमच्या काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर आजीबाईचे हृदय सुरू झाले.
- मिलिंद घारपुरे, विद्यार्थी, एमबीबीएस, जीएमसी, अकोला

Web Title: ... And medical students save old age women life in the running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.