अनाथ सुनिताच्या जीवनात फुलला ‘आनंद’!
By Admin | Updated: February 14, 2015 01:58 IST2015-02-14T01:58:25+5:302015-02-14T01:58:25+5:30
लोकमत जागर; अनाथ मुलीला दिले हक्काचे घर.

अनाथ सुनिताच्या जीवनात फुलला ‘आनंद’!
सुधीर चेके पाटील/चिखली (बुलडाणा): जन्मदात्या आईचे छत्र काळाने हिरावले, तर सावत्र आई आणि वडिलांनी झिडकारले.... अशा पाच वर्षाच्या मुलीला मायेची ऊब देऊन, पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील एका मोठ्या मनाच्या बापाने या लेकीचे बुधवारी कन्यादान केले. सावत्र आई व वडिलांनी नाकारलेल्या सुनिता नावाच्या या चिमुकलीला चिखली तालुक्यातील शेलसुर येथील उत्तमराव सोनाजी धंदर यांच्या कुटुंबाने पोटच्या लेकीप्रमाणे वाढवले. उत्तमराव धंदर यांनी राजेंद्र, माधुरी व वैशाली या त्यांच्या नातवांप्रमाणेच सुनितालाही माया लावली. या नातवंडांसोबतच सुनिताही लहानाची मोठी झाली, चांगलं शिक्षण घेतलं... शिक्षिका झाली. पाहता-पाहता ती लग्नाच्या उंबरठ्यावर पोहोचली. उत्तमरावांनी ही जबाबदारीही पार पाडली. त्यांचा नातू आनंद मुंबईस्थित एका फार्मास्युटीकल कंपनीत नोकरी करतो. उत्तमरावांनी ११ फेब्रुवारी रोजी सुनिताचा विवाह आनंदशी लावून देऊन, कन्यादानाचेही कर्तव्यही पूर्ण केले. सुनिताच्या भविष्याचा विचार करून उत्तमरावांनी आनंदने तिच्याशी लग्न करावे, अशी इच्छा व्यक्त केली. आजोबांची इच्छा प्रमाण माणून आनंदने कोणतेही आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला. ११ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे नोंदणी पध्दतीने हा विवाह सोहळा पार पडला. (तालुका प्रतिनिधी) बॉक्स.... दुष्काळी परिस्थितीचा विचार करून विवाह सोहळ्यांवर होणारी उधळपट्टी टाळण्याचे आवाहन ‘लोकमत जागर’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पृष्ठभूमिवर उत्तमराव धंदर यांनी सुनिता व आनंद यांचा विवाह नोंदणी पध्दतीने करून समाजाला चांगला संदेश दिला आहे.