अकोला : दि अकोला मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून एटीएम कार्डाची सक्ती न करता स्लिपद्वारे पीक कर्जाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एटीएम कार्डाद्वारे पीक कर्ज वितरित करण्याचा निर्णय बॅँकेने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणीही सेवा सहकारी सोसायटीकडून करण्यात येत होती. या निर्णयाविरुद्धची तक्रार बॅँकेच्या अध्यक्षांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती रिझर्व्ह बॅँक, सहकारी मंत्री आणि जिल्हा उपनिबंधकांकडेही पाठविण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर बॅँकेने हा निर्णय घेतला आहे. एटीएम कार्ड घेतल्याशिवाय पीक कर्ज मिळणार नाही, असे सेवा सहकारी सोसायटीकडून सांगण्यात येत आल्याची तक्रार शेतकरी दीपक गावंडे यांनी बॅँकेच्या अध्यक्षांकडे केली होती. कोणतीही सेवा सहकारी सोसायटी अथवा बॅँक खातेदाराला एटीएम कार्ड घेण्याची सक्ती करू शकत नाही. एटीएम कार्ड वापरण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हा संबंधित खातेदाराला आहे. काही शेतकर्यांना पैसे काढण्याची स्लिप (विड्राल स्लिप) भरता येत नाही. तसेच त्यांना एटीएम कार्डाचा वापरही करता येत नाही. त्यामुळे अशा शेतकर्यांना एटीएम कार्डाचा वापर करण्याकरिता दुसर्याची मदत घ्यावी लागेल. परिणामस्वरूप अशा शेतकर्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे, असेही गावंडे यांनी तक्रारीत म्हटले होते.
**तक्रारीनंतर दिली मुभा
दीपक गावंडे यांनी उपरोक्त प्रकाराची तक्रार आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. मुनगंटीवार यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला पत्र लिहून योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली. या पत्राचे बॅँकेने उत्तर पाठविले. शेतकर्यांना केसीसी डेबिट कार्डद्वारे कर्ज देण्याचे धोरण राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅँक अर्थात नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अवलंबविण्यात आले. या योजनेला शेतकर्यांनी प्रतिसादही दिला. ज्या शेतकर्यांना एटीएमऐवजी स्लिपद्वारे कर्ज वितरण हवे आहे, त्यांना मुभा देण्यात आली आहे, असेही बॅँकेने नमूद केले आहे.