शिवसेनेला विश्वासात घेऊनच जागा वाटप - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:37 AM2018-12-26T05:37:39+5:302018-12-26T05:38:01+5:30
देशासह राज्यात भाजपाला जातीयवादी पक्षाचे लेबल लावण्यासाठी काँग्रेसने धडपड चालविली असून, त्यातूनच विविध राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे.
अकोला : देशासह राज्यात भाजपाला जातीयवादी पक्षाचे लेबल लावण्यासाठी काँग्रेसने धडपड चालविली असून, त्यातूनच विविध राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष असून, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात घेऊनच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दानवे यांनी राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. अकोला, बुलडाणा व भंडारा मतदारसंघांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने ते अकोल्यात आले होते. भाजपाच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत देशात कधीही जातीय दंगली उसळल्या नसल्याचे शल्य कदाचित काँग्रेसला वाटत असावे. त्यातूनच देशात अस्थिरता पसरवून तरुणांची माथी भडकविण्याचे काम
काँग्रेसकडून केल्या जात असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी
केली.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता बिहार तसेच महाराष्ट्रात शिवसेनेकडून लोकसभेच्या जागा वाटपासाठी दबावतंत्राचा वापर होत आहे का, अशी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना विचारणा केली असता भाजपा कोणासमोरही हतबल नसून, केवळ समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा भाजपाचा प्रामाणिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिर राजकीय नव्हे, आस्थेचा विषय!
भाजपाने साडेचार वर्षांच्या कालावधीत राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्त्यांचे जाळे विणले असून, विकासाच्या मुद्यावरच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढल्या जाणार, असे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सांगितले. काँग्रेसने निर्माण केलेल्या अस्थिर वातावरणात राम मंदिर हा राजकीय नव्हे, तर आस्थेचा विषय असून, तो मार्गी लागणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी स्पष्ट केले.