जप्तीतील तांदूळ व साखरेचे शिधापत्रिकाधारकांना वाटप करा
By Admin | Updated: September 20, 2014 00:59 IST2014-09-20T00:59:27+5:302014-09-20T00:59:27+5:30
अकोला जिल्हाधिकार्यांचे आदेश : ठोस उपाययोजना नाही.

जप्तीतील तांदूळ व साखरेचे शिधापत्रिकाधारकांना वाटप करा
आकोट : तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात महसूल विभागाच्या धाडीत जप्त केलेला १७१ कट्टे तांदूळ व किराणा दुकानात जप्त केलेली १९ कट्टे साखरेची आकोट तालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांना एपीएलच्या दराने विक्री करून येणारी रक्कम शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी १५ सप्टेंबर २0१४ रोजी दिले. उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना २७ सप्टेंबर २0१३ ला सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप करावयाच्या धान्यसाठय़ाची अवैध वाहतूक करणार्या एका ट्रकमध्ये १७१ कट्टे तांदूळ आढळून आला. हा तांदूळ चोहोट्टा बाजार येथील गणेश सुरजमल अग्रवाल यांचा असल्याच्या माहि तीवरून पुरवठा निरीक्षकांनी त्यांच्या किराणा दुकानाची तपासणी केली असता त्यामध्ये १९ कट्टे साखर व २१ कट्टे गहू आढळून आला. या मालाच्या खरेदीच्या पावत्या अग्रवाल सादर करू शकले नाही. त्यामुळे तांदूळ, गहू व साखर हा धान्यसाठा महसूल विभागाने शासन दरबारी जमा केला. या प्रकरणी दहीहांडा पोलिस स्टेशनमध्येसुद्धा गणेश अग्रवाल, ट्रक मालक-चालक सुशील उरे, श्याम राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रेल येथील स्वस्त धान्य दुकानदार मनकर्णाबाई इंगळे यांचे दुकान तपासणीअंती सील करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या धान्यसाठय़ाविषयी जिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे पुरवठा निरीक्षण अधिकार्यांनी या प्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत आदेशाची मागणी केली.