ग्रामीण भागातील सर्वच कोविड केअर सेंटर सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:11+5:302021-02-23T04:29:11+5:30
ऑक्टोबर २०२० नंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटर बंद करून ...

ग्रामीण भागातील सर्वच कोविड केअर सेंटर सुरू!
ऑक्टोबर २०२० नंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटर बंद करून बहुतांश रुग्णांना होम आयसोलेशनमध्येच संदर्भित करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फेब्रुवारीमध्ये कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने पसरत आहे. परिणामी, बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटरची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. याठिकाणी ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा सर्वच रुग्णांना तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे सेंटर झाले सुरू तालुका - कोविड केअर सेंटर अकोट - देवरी फाटा
अकोट - आयडीआय हेंडा (सुरू)
तेल्हारा - जि.प. शाळा
बाळापूर - शेळद
पातूर - आयुर्वेदिक कॉलेज
अकोला - आरसीटी (आयुर्वेदिक- आजपासून सुरू)
सुपर स्पेशालिटी सुरू होण्याची शक्यता
जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावर ताण वाढत आहे. संभाव्य परिस्थिती पाहता कोविड रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा वापर होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. शिवाय, त्यासाठी मंजूर पदेही लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बंद करण्यात आलेले तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. पीकेव्हीतील कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ज्या रुग्णांकडून नियमांचे पालन होत नाही, अशांवर कारवाई केली जाईल.
-डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ.