नागरी विमान वाहतूक सेवेत अकोल्याचा समावेश होणार!
By Admin | Updated: August 25, 2016 02:05 IST2016-08-25T02:05:36+5:302016-08-25T02:05:36+5:30
अकोला हद्दवाढीचा निर्णय लवकरच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

नागरी विमान वाहतूक सेवेत अकोल्याचा समावेश होणार!
अकोला, दि. २४: नागरी विमान वाहतूक सेवेत राज्यातील अकरा विमानतळांमध्ये अकोल्याचाही समावेश केला जाणार असून, हद्दवाढ लवकरच होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी व सभापती विजय अग्रवाल यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली
राज्यातील दहा विमानतळावरून नागरी विमान वाहतूक सेवेला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये अकोल्यातील शिवणी विमानतळाचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी राज्य सरकारचा करार झाला. नागरी विमान वाहतूक सेवेत अकोल्याचाही समावेश करावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरली होती. त्यासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्र्यांनी आ. शर्मा, आ. सावरकर यांना आश्वस्त केले. केंद्र सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण राज्य सरकारला सर्व सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देणार सहाय्यता निधी
शहरात आदर्श कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर शोषखड्डय़ात बुडून मृत्यू झालेल्या कृष्णा बहल व सिद्धेश धनगावकर या बालकांसह बोरगाव मंजू येथील श्याम संजय सोळंके, अनिल अरुण लांधे, मोठी उमरीतील रमेश बळीराम करंगळे, आकोट तालुक्यातील एदलापूर येथील कपील समाधान दांडगे यांचा अपघाती मृत्यू झाला. मृतकांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याची मागणी आ. शर्मा, आ. सावरकर यांनी लावून धरली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.