अकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाणार नाही! - वर्षपूर्तीनिमित्त महापौर विजय अग्रवाल यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:40 IST2018-03-10T14:40:33+5:302018-03-10T14:40:33+5:30
अकोला : अकोलेकरांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाणार नाही! - वर्षपूर्तीनिमित्त महापौर विजय अग्रवाल यांची ग्वाही
अकोला : शहरवासीयांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच भाजपाला महापालिकेची सत्ता ताब्यात घेता आली. राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे शहराच्या विकास कामांसाठी २०१४ पासून निधीचा ओघ कायमच सुरू आहे. प्राप्त निधीतून शहराच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असून, अकोलेकरांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतील सत्तास्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त विकास कामांची माहिती देताना ते बोलत होते.
फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपावर विश्वास ठेवत मतांचे भरभरून दान दिले. सर्वसामान्यांच्या बळावरच आम्ही मनपाची सत्ता मिळवू शकलो. मनपासह राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळेच विकास कामांचा मार्ग खºया अर्थाने मोकळा झाल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. मनपा क्षेत्राची हद्दवाढ केल्यानंतर संबंधित भागात मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी ३२४ कोटींचा आराखडा तयार केला. मनपाच्या सभागृहाने हा आराखडा मंजूर करून निधीसाठी शासनाकडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात किमान १०० कोटींचा निधी प्राप्त होईल. त्याद्वारे हद्दवाढीच्या क्षेत्रात विकास कामे पूर्ण केली जातील. शहरवासीयांसाठी सिटी बस सेवा सुरू करण्यात आली. रस्ते, एलईडी पथदिवे, अठरा ठिकाणी हरित पट्टे (ग्रीन झोन), १८ हजार शौचालयांचे निर्माण करण्यासोबतच दररोज कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटागाड्यांची व्यवस्था, उघड्यावर साचणारा कचरा उचलण्यासाठी २५ ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना निकाली काढण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. यावेळी स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, सारिका जयस्वाल, दीप मनवानी उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणेचे आभार
शहर विकासाची जबाबदारी निभावण्यासाठी सत्ताधारी व प्रशासकीय यंत्रणेत समन्वय अपेक्षित आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे सांगत प्रशासकीय यंत्रणेचे महापौरांनी आभार व्यक्त केले.