अकोलेकरांनो! नियम पाळा; अन्यथा निर्बंध अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:53+5:302021-05-08T04:18:53+5:30
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता ...

अकोलेकरांनो! नियम पाळा; अन्यथा निर्बंध अटळ
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता सतावते. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांची भयावह संख्या समोर येत आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेच्या खरेदीची सूट दिली आहे. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. शहराच्या मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम आहे. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंधांचे संकेत दिले; मात्र नागरिकांवर याचा काही फरक पडला नसल्याचे दिसून येते. सगळेच व्यवहार बंद हाेण्यापेक्षा काही दिवस संयम पाळून गर्दी कमी केली तर काेराेनाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अन्यथा शहराच्या अर्थकारणालाच ब्रेक लागेल अन् ते काेणालाही परवडणारे नाही.
--बॉक्स--
या मार्गावर सर्वाधिक गर्दी
ताजनापेठ ते जैन मंदिर व गांधी रोड या मार्गावर सर्वाधिक गर्दी होत आहे. हीच परिस्थिती टिळक रोडवरील बियाणी चौकातील आहे. या मार्गावर प्रत्येक दुकानापुढे दोन-चार नागरिक दिसून येतात.
--बॉक्स--
कठोर निर्बंधांचे हेही एक कारण!
जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सूट आहे; मात्र नागरिक सकाळी ११ वाजेनंतर विनाकारण फिरत आहेत. शहरातील डाबकी रोड, कौलखेड रोड, पीकेव्ही तसेच विविध परिसरातील नगरांमध्ये माॅर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकच्या नावाखाली मुक्त संचार सुरू आहे.
--बॉक्स--
चौकात कोरोना टेस्ट ; तरीही मुक्त संचार
पोलीस व मनपा प्रशासनाकडून दंडात्मक आणि फौजदारी कारवाई तसेच वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. परंतु, अकोलेकर ऐकायला तयार नाहीत. त्यानुसार शहरातील चौकात कोरोना टेस्ट केली जात आहे. तरीही नागरिक विनाकारण फिरत आहेत.
--बॉक्स--
कुटुंब घेऊन खरेदीला
अत्यावश्यक सेवेचा कालावधी वगळता रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये काही महाभाग गरज नसताना पत्नी व मुलांना घेऊन खरेदीसाठी फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवापेक्षा कुटुंबासोबत खरेदी महत्त्वाची झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--बॉक्स--
पाेलिसांच्या दंडुक्यांशिवाय सुधारणार नाही का?
पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाेलिसांनी दंडुक्यांचा वापर केल्यामुळे रस्त्यावरची गर्दी ओसरली हाेती. आता संचारबंदी असली तरी पाेलिसांनी दंडुक्यांऐवजी दंड हा पर्याय निवडला आहे. पाेलिसांनी केलेल्या दंडालाही नागरिक भीक घालत नाहीत, त्यामुळे पुन्हा दंडुकेच हवे आहेत का? असाही प्रश्न निर्माण हाेत आहे.