आज धावणार अकोलेकर!
By Admin | Updated: January 11, 2015 01:11 IST2015-01-11T01:11:06+5:302015-01-11T01:11:06+5:30
आयएमए वॉकथॉन; जगविख्यात धावपटू मिल्खासिंग यांच्या उपस्थितीत विविध गटात होणार स्पर्धा.

आज धावणार अकोलेकर!
अकोला : इंडियन मेडिकल असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकथॉन स्पर्धा रविवार, ११ जानेवारी रोजी होत आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यावर्षीच्या आयएमए वॉकथॉनमध्ये अवयव दान, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री जनधन योजना याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. अवयवदानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे डॉ. रवी वानखडे अकोल्यात येणार आहे. स्पर्धेला सकाळी ७.३0 वाजता आयएमए हॉल सिव्हिल लाइन येथून सुरुवात होईल. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, गोपीकिसन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, महापौर उज्ज्वला देशमुख, क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा ३ कि.मी., ६ कि.मी. व १0 कि.मी. ची राहणार आहे. त्यासाठी ३ वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मार्गावर स्वच्छता, अल्पोपाहार, औषधोपचारसह अवयवदान, स्वच्छता अभियान, जनधन योजनांच्या प्रचाराचे फलक लावण्यात येतील. या निमित्ताने छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहेत. विविध समित्यांचेदेखील गठण करण्यात आले आहे. स्पर्धेचे पंच म्हणून क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनात धनंजय भगत, शरद कोकाटे, अशोक मंडले, प्रभाकर रुमाले आदींसह अनेक संघटनांचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
*मिल्खासिंगची उपस्थिती
फ्लाईंग शिख म्हणून प्रसिद्ध असलेले जगविख्यात धावपटू मिल्खासिंग या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणार आहे. शनिवारी सायंकाळीच ते अकोल्यात दाखल होणार होते, मात्र, त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रमात ऐन वेळेवर बदल झाला आहे. त्यामुळे ते स्पर्धेच्या उद्घाटनाच्यावेळेपर्यंंत अकोल्यात दाखल होतील, असे आयोजनांतर्फे सांगण्यात आले.