अकोल्यात लवकरच अत्याधुनिक ‘सायबर लॅब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:21 IST2016-08-01T01:21:39+5:302016-08-01T01:21:39+5:30
सोशल मीडियावर राहणार वॉच; सायबर तज्ज्ञांकडून होणार तपासणी.

अकोल्यात लवकरच अत्याधुनिक ‘सायबर लॅब’
सचिन राऊत / अकोला
गुन्हेगारीचे स्वरूपही बदलले असून खून, दरोडे, हाणामार्या या गुन्हय़ांसोबतच आता सायबर गुन्हय़ांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर गुन्हय़ांचा शोध लावण्यासाठी आणि त्यावर अंकुश मिळविण्यासाठी अकोल्यात लवकरच अत्याधुनिक सायबर लॅब कार्यान्वित होणार आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पाठपुराव्यानंतर या लॅबचा लवकरच शुभारंभ होणार असून सायबर तज्ज्ञांकडून विविध विघातक घडामोडींवर या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित होणार असलेल्या या अत्याधुनिक सायबर लॅबचे कामकाज सध्याचे सायबर सेलचे कर्मचारी सांभाळणार आहेत. सायबर तज्ज्ञांचीही या लॅबमध्ये उपस्थिती राहणार असून या सायबर लॅबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्यात येत असलेले आक्षेपार्ह चित्र, व्हिडिओ यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच सोशल मॉनिटरिंग सेंटरही या लॅबमध्ये राहणार असून त्यामुळे विविध प्रकारच्या विघातक घडामोडींच्या हालचाली टिपण्यात येणार आहेत. सायबर लॅबमध्ये कॉल डाटा रेकॉर्ड अँनालिसिस करण्यात येणार आहे, तर मोबाइल फॉरेन्सिक अँनालिसिसही याच ठिकाणी होणार आहे.
सायबर लॅबमुळे सायबर गुन्हय़ांच्या तपासाला चांगलीच गती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वैभवात सर्वात मोठी भर टाकणारी ही सायबर लॅब १५ ऑगस्टलाच कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण तयारी सायबर सेलकडून करण्यात येणार आहे.
दोन संगणकावर चालविण्यात येत असलेले सायबर सेलचे कामकाज सायबर लॅबमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरू होणार आहे. ही लॅब अत्याधुनिक राहणार असून राज्यातील काही मोजक्याच जिल्हय़ात सदरची लॅब कार्यान्वित असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता अकोल्यात ही लॅब होणार असून अकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सायबर गुन्हय़ांवर अंकुश लावण्यास ही लॅब महत्त्वाची राहणार आहे.