अकोल्यात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक!

By Admin | Updated: April 5, 2016 01:52 IST2016-04-05T01:52:08+5:302016-04-05T01:52:08+5:30

संतप्त जमावाने ट्रक व कारच्या काचा फोडल्या, सुरक्षा रक्षकास मारहाण.

Akolatan encroachment eradication stone! | अकोल्यात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक!

अकोल्यात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक!

अकोला: महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी दुपारी अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान गांधी रोडवरील अतिक्रमण केलेल्या टपर्‍या हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमक टपर्‍या, हातगाड्या हटवत नसल्याचे पाहून पथकाच्या जेसीबीने अनेक टपर्‍यांवर प्रहार करून त्या तोडल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या एका अतिक्रमकाने मनपाच्या ट्रकवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. एवढेच नव्हे, तर त्याला अटकाव करणार्‍या सुरक्षा रक्षकाससुद्धा लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. मनपाचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, नगररचना विभागाचे अभियंता संदीप गावंडे हे जेसीबी घेऊन अतिक्रमण निर्मूलन पथकासह कोतवाली चौकात पोहोचले. या ठिकाणापासून पथकाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला. रस्त्यालगत असलेले पानठेले, टपर्‍या, हातगाड्या हटविण्याचे काम सुरू होते. अतिक्रमकांना वारंवार सूचना देऊनही ते त्यांच्या टपर्‍या, हातगाड्या हटवत नव्हते. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या माध्यमातून टपर्‍या, हातगाड्या, ठेल्यांवर प्रहार करून ते तोडण्यास प्रारंभ केल्याने एकच धावपळ उडाली. अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईची मोहीम पुढे सरकवत गांधी रोडवर आले. मनपा कार्यालयाजवळील एक टपरी हटविण्यात आल्यावर उर्वरित टपर्‍या, ठेल्यांवर जेसीबीने प्रहार करून ते तोडण्यास प्रारंभ केला. दरम्यान, दीपक टोम्पे नामक व्यक्तीचा क्रॉकरीचे साहित्य असलेला ठेलासुद्धा जेसीबीने तोडला आणि पथक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ पोहोचले. ठेला तोडल्यामुळे संतप्त झालेला दीपक टोम्पे या ठिकाणी आला आणि त्याने मनपाच्या एमएच ३0 एच ५00६ क्रमांकाच्या ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मनपाचे सुरक्षा रक्षक विजय अंभोरे यांच्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांना जखमी केले. टोम्पे एवढं करून थांबला नाही. तो खोलेश्‍वर परिसरातील मनपा वाहन विभागात गेला आणि त्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन अधिकारी विष्णू डोंगरे यांच्या एमएच ३0 एडी ३0९९ क्रमांकाच्या मोटारसायकलचीसुद्धा तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, ठाणेदार अनिरुद्ध आढाव, प्रकाश सावकार, शेख रियाज घटनास्थळावर पोहोचले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दीपक टोम्पेविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Akolatan encroachment eradication stone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.