अकोल्याची बॉक्सर नेहा देशात तिसरी
By Admin | Updated: October 18, 2014 23:22 IST2014-10-18T23:22:42+5:302014-10-18T23:22:42+5:30
वरिष्ठ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक.

अकोल्याची बॉक्सर नेहा देशात तिसरी
अकोला: रायपूर (छत्तीसगड) येथे बॉक्सिंग इंडियाद्वारा आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत शानदार प्रदर्शन करीत अकोल्याच्या नेहा रोठे हिने महाराष्ट्राला दिवाळीची भेट दिली. देशात तिसर्या स्थानासह कांस्यपदक पटकाविले. नेहा हिने दिल्ली व केरळच्या बॉक्सरांना पराभूत करीत पदक मिळविले.
उपान्त्य फेरीत पायाला दुखापत झाल्याच्या कारणाने नेहाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले; मात्र तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता, तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराकरिता प्रवेश देण्यात आला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता नेहाची दावेदारी निश्चित होणार आहे.
नेहा अकोला अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची नियमित खेळाडू असून, वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण प्राप्त करीत आहे. नेहाच्या यशस्वी कामगिरीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने विशेष कौतुक केले.