अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अखर्चित तीन कोटी निधी वळता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:26 IST2018-07-13T13:24:37+5:302018-07-13T13:26:27+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा गेल्या तीन वर्षांपासून अखर्चित असलेला तीन कोटी एक लाख रुपये निधी वळता करण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अखर्चित तीन कोटी निधी वळता
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा गेल्या तीन वर्षांपासून अखर्चित असलेला तीन कोटी एक लाख रुपये निधी वळता करण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. हा निधी विविध बारा योजनांसाठी खर्च केला जाणार आहे, असे सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांनी सांगितले.
कृषी समितीची सभा गुरुवारी सभापती गावंडे यांच्या कक्षात झाली. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते रमण जैन, चंद्रशेखर पांडे गुरुजी, रेणुका दातकर, शोभा शेळके, विलास इंगळे, कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे उपस्थित होते. सभेत २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षातील अखर्चित असलेला ३ कोटी १ लाख १४ हजार ४७५ रुपये निधी वळता करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यातून विविध साहित्य वाटपाच्या बारा योजना राबवण्याचेही ठरले. चालू वर्षात २०१८-१९ मध्ये विविध लाभाच्या योजनांसाठी प्राप्त लाभार्थी यादीला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये डीझल पंप, सबमर्सिबल पंप, स्पायरल बाइंडर, एचडीपीई पाइपच्या लाभार्थींचा समावेश आहे. ४० लाख रुपये खर्चातून होत असलेल्या ताडपत्री वाटपाची लाभार्थी यादीही यावेळी मंजूर करण्यात आली. समितीचे सचिव कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांचे समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.