बनावट दस्तऐवजांवर अकोला पोलीस अधीक्षकांचा बोगस शिक्का!
By Admin | Updated: December 17, 2015 02:28 IST2015-12-17T02:28:57+5:302015-12-17T02:28:57+5:30
किडनी तस्करी प्रकरण: कोमलकरच्या दस्तऐवजांवर शिक्क्याचा वापर.

बनावट दस्तऐवजांवर अकोला पोलीस अधीक्षकांचा बोगस शिक्का!
अकोला: किडनी तस्करी प्रकरणाला बुधवारी धक्कादायक वळण मिळाले. या प्रकरणामध्ये किडनी देण्यासाठी आणि प्रत्यारोपण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजांसोबतच अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस शिक्कासुद्धा वापरण्यात आल्याचे पोलीस तपासातून उघड झाले. किडनी देणार्या देवानंद कोमलकरचे दस्तऐवज तयार करून त्यावर अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस शिक्का मारण्यात आल्याची गंभीर बाब स्पष्ट झाली. जुने शहरातील हरिहरपेठमध्ये राहणारा देवानंद कोमलकर याची किडनी खरेदी करणारा नंदूरबार जिल्हय़ातील नवापूर येथील शिक्षक सुधाकर नाईक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त व्हायचा आहे. पोलीस तपासामध्ये देवानंद कोमलकर याला किडनी देण्यासाठी तयार करून, आरोपींनी त्याचे दस्तऐवज तयार केले. या दस्तऐवजानुसार त्याला अकोल्यातील रहिवासी न दाखविता, तो नंदूरबार येथील रहिवासी असल्याचे दर्शविण्यात आले. एवढेच नाहीतर कोमलकर याची किडनी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजांवर अकोला पोलीस अधीक्षकांच्या नावाचा बोगस रबर स्टॅम्प (शिक्का) तयार करून, त्याचा उपयोग करण्यात आला. आरोपींनी हे बोगस रबर स्टॅम्प कोठून बनविले आणि किती प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनविलेल्या रबर स्टॅम्पचा उपयोग करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस गोळा करण्याकामी लागले आहेत.