अकोला सवरेपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा झाली विस्कळीत
By Admin | Updated: November 13, 2014 01:18 IST2014-11-13T01:18:41+5:302014-11-13T01:18:41+5:30
परिचारिकांनी केले काम बंद आंदोलन.

अकोला सवरेपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा झाली विस्कळीत
अकोला : सवरेपचार रुग्णालयात कार्यरत २७३ परिचारिकांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. परिचारिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात नारेबाजीदेखील केली. परिचारिका कामावर उपस्थित नसल्यामुळे काही काळ आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, दुपारी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. सवरेपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा ज्यांच्या भरवशावर आहे, अशा परिचारिकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. सकाळी ९ पासूनच २७३ परिचारिका रुग्णालयासमोर एकत्र झाल्या व त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली. परिचारिकांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी महाराष्ट्र गव्हरन्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष अरुणा वाघमारे व महासचिव अंजली मेटकर यांना चर्चेसाठी बोलावले आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे लिखित आश्वासन दिले. दुपारी १ वाजता पारिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.