अकोला पश्चिममध्ये मातब्बर नेते रिंगणात !
By Admin | Updated: September 29, 2014 01:48 IST2014-09-29T01:48:37+5:302014-09-29T01:48:37+5:30
अल्पसंख्याक मतांचे विभाजन नेहमीच भाजप उमेदवाराच्या पथ्यावर.

अकोला पश्चिममध्ये मातब्बर नेते रिंगणात !
अकोला : दोन दशकांपासून विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात एक हाती विजय मिळवणार्या भारतीय जनता पार्टीला यंदाच्या निवडणुकीत कडवी झुंज द्यावी लागणार आहे. युती तुटल्यामुळे शिवसेनेच्यावतीने माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे तर भाजपकडून आ. गोवर्धन शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरला. या दोन उमेदवारांच्या लढतीत आता काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विजय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केल्याने अकोला पश्चिम मतदारसंघा तील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेचे गावंडे व राकाँचे विजय देशमुख यांच्या उमेदवारीमुळे भाजप, काँग्रेस तसेच भारिप-बहुजन महासंघाच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या जाण्याची चिन्हं आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघातून सलग चार वेळा भाजप-शिवसेना युतीच्या गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला. काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या अल्पसंख्याक मतांचे विभाजन नेहमीच भाजप उमेदवाराच्या पथ्यावर पडले. भरीस भर भारिप-बहुजन महासंघाने त्यांची मतपेढी सांभाळून ठेवल्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला मिळाला. यंदा मात्र शिवसेना, भाज पची युती व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यामुळे मतदारसंघात प्रचंड राजकीय उलथा पालथ झाली. सद्यस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विजय देशमुख या दिग्गजांनी दंड थोपटले आहेत. काँग्रेसच्यावतीने नगरसेविका उषा विरक तर भारिप-बहुजन महासंघाकडून वाडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच आसिफ खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरसीची लढत होणार आहे.