अकोला पोलिसांची आता सायकल पेट्रोलिंग
By Admin | Updated: March 13, 2016 01:54 IST2016-03-13T01:54:05+5:302016-03-13T01:54:05+5:30
शहरात ठेवणार वॉच, पोलीस अधीक्षकांची संकल्पना.

अकोला पोलिसांची आता सायकल पेट्रोलिंग
अकोला : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या सूचनेवरून तसेच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून शहरासाठी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. शहरातील सात पोलीस कर्मचार्यांना सायकलीचे वितरण करण्यात आले असून, हे पोलीस कर्मचारी शहराच्या विविध भागात सायकलवर फिरून गैरकायदेशीर प्रकारांवर वॉच ठेवणार आहेत.
पोलीस रस्त्यावर दिसावे, पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संवाद वाढावा, या हेतूने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शनिवारी सायकल पेट्रोलिंग सुरू केली. रस्त्यावर फिरणार्या महिला, मुली यांना पोलीस शहराच्या प्रत्येक ठिकाणी हजर असल्याचे दिसावे. तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवून सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम प्राथमिक स्तरावर शहरात राबविण्यात येत असून, लवकरच तो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. सात सायकलींवर शनिवारपासून पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असून, या पेट्रोलिंगला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख जितेंद्र सोनवने, जिल्हा विशेष शाखाप्रमुख संजय खांडेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.