अकोल्यात पोलीस आयुक्तालय, सुपर स्पेशालिटी व कर्करोग रुग्णालय
By Admin | Updated: March 10, 2015 02:08 IST2015-03-10T02:08:18+5:302015-03-10T02:08:18+5:30
राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्य शासनाने दिली ग्वाही.

अकोल्यात पोलीस आयुक्तालय, सुपर स्पेशालिटी व कर्करोग रुग्णालय
अकोला- वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रात पोलीस आयुक्तालय सुरू करण्यास मान्यता देण्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुसज्य कर्करोग देखभाल केंद्र स्थापन करण्याची ग्वाही राज्य शासनाने सोमवारी दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात करताना राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख करण्यात आला. राज्यात प्रत्येक महापालिका क्षेत्रात पोलीस आयुक्तालय सुरू करण्याच्या उद्देशाने अकोला येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यास शासनाने प्राथमिक मान्यता दिली असल्याचे सोमवारी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणातून जाहीर केले. त्यामुळे अकोल्यात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यावर शासनाची मोहर उमटली आहे. आयुक्तालयासोबतच अकोला येथे पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) आणि कर्करोग उपचार योजनेंतर्गत एक दर्जेदार कर्करोग देखभाल केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणातून सांगितले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अकोला येथील तीन प्रमुख मागण्यांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आल्याने या तिन्ही योजनांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे. शहराच्या विकासाची ही सुरुवात मानली जात आहे. यासंदर्भात अकोल्याचे पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तालयासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटिल आणि कर्करोग देखभाल केंद्राला शासनाने मंजुरी दिली असल्याचे सांगीतले. राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख आहे. अकोल्यातील विकास कामांची ही सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.