अकोला : सम आणि विषम तारखांना आस्थापना सुरू, बंद ठेवण्याबाबतच्या आदेशात बदल करून दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी अटी-शर्तींसह मुभा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी रात्री निर्गमित केला आहे.अकोला जिल्ह्यामध्ये १७ मेच्या मध्यरात्रीपर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सीमाबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्या व्यक्ती या बहुतांश महानगरपालिका क्षेत्रामधील असून, शहराच्या सर्व भागामध्ये ‘कंटेनमेंट झोन’मधील नियोजनानुसार सर्व क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यासाठी रविवार, ३ मे रोजी जारी केलेले सम-विषम दिनांकास प्रतिष्ठाने सुरू व बंद ठेवण्याबाबतचा आदेश रद्द करण्यात आला आहे. सुधारित आदेशानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत ६ ते १७ मे २०२० या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आस्थापना व आवश्यक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याबाबत आदेश दिला आहे. औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, शेती संबंधित व्यवसायांना पूर्वीप्रमाणे सूट कायम राहणार आहे. बँकांचे व्यवहार त्यांच्या वेळेप्रमाणे पूर्ववत करण्यात आले आहेत. देण्यात आलेल्या सवलतीचा वापर करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत.‘कंटेनमेंट झोन’मध्ये निर्बंध कायमच!महानगरपालिका क्षेत्रातील, नगर परिषद क्षेत्रातील ज्या ठिकाणास प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. अशा ठिकाणी यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध कायमच ठेवण्यात आले आहेत.ग्रामीण भागातील व्यवहार पूर्ववत करण्याकडे कलअकोला महानगरपालिका व जिल्ह्यातील नगरपालिकांचे क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने सवलत दिली आहे; मात्र या भागातील हॉटेल्स, चहा दुकाने, पानठेले, सलून वगळता इतर प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पंखे, कूलरची आॅनलाइन बुकिंग, घरपोच व्यवस्थाअकोला शहरातील वाढते तापमान लक्षात घेता पंखे, कूलर, एसीची विक्री करता येईल; मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांनी आॅनलाइन बुकिंग घ्यावे व आपल्या गोदामातून संबंधित माल ग्राहकाला घरपोच करण्याचे निर्देश दिले आहेत.
अकोला : सकाळी ६ ते सायंकाळी ४ पर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी मुभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:26 IST