अकोला पं.स.च्या चार सदस्यांचे सदस्यपद होणार बाद?
By Admin | Updated: August 17, 2016 02:34 IST2016-08-17T02:34:00+5:302016-08-17T02:34:00+5:30
मनपा हद्दवाढीचा सभापतींना फटका : बाजू मांडण्यासाठी जिल्हाधिका-यांनी बजावली नोटीस

अकोला पं.स.च्या चार सदस्यांचे सदस्यपद होणार बाद?
अकोला, दि. १६: महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये अकोला पंचायत समितीच्या चार गणाचे पूर्ण क्षेत्र जात आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद होण्याची शक्यता आहे. सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी बाजू मांडण्याकरिता शनिवार, २0 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी अकोला पंचायत समितीच्या सभापतींसह चार सदस्यांना १२ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्राथमिक अधिसूचनेनुसार अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित मनपा हद्दवाढीमध्ये अकोला शहरानजिकच्या २४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
त्यामध्ये अकोला पंचायत समितीच्या खडकी बु., मलकापूर भाग भाग-२, उमरी प्र.बाळापूर व शिवणी या चार गणांचे सर्व क्षेत्र हद्दवाढीत जात आहे. या पृष्ठभूमीवर या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार्या अकोला पंचायत समिती सदस्यांच्या सदस्यत्वाबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असून, पंचायत समितीच्या संबंधित गणाच्या चार सदस्यांची बाजू समजून घेण्यासाठी शासनामार्फत जिल्हाधिकार्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार पंचायत समितीचे सदस्यपद रद्द करण्यापूर्वी, पंचायत समितीच्या संबंधित चार सदस्यांची बाजू जिल्हाधिकारी समजून घेणार आहेत. या संदर्भात बाजू मांडण्यासाठी २0 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोला पंचायत समितीच्या चार सदस्यांना बजावली आहे. त्यामध्ये पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह चार सदस्यांचा समावेश आहे.