अकोला मनपाची गाडी सुसाट; १४ कोटींची विकास कामे निकाली
By Admin | Updated: January 6, 2015 01:34 IST2015-01-06T01:34:56+5:302015-01-06T01:34:56+5:30
मूलभूत सोयी, पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा.

अकोला मनपाची गाडी सुसाट; १४ कोटींची विकास कामे निकाली
अकोला: महापालिकेला मूलभूत सोयी सुविधा व पायाभूत सुविधांसाठी प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून १४ कोटी १६ लाखांची विकास कामे उशिरा का होईना प्रशासनाने निकाली काढली आहेत. बांधकाम विभाग, जलप्रदाय विभाग व विद्युत विभागाने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रशासनाने ९ कोटी १९ लाख ५८ हजारांच्या कामांची ई-निविदा प्रकाशित केली असून, ५ कोटी ५९ लाख ४१ हजार ७६४ रुपयांच्या विकास कामांचे कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यात आले आहेत. एकूणच, मनपाची विकासात्मक गाडी सुसाट निघाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मूलभूत सोयी सुविधा व पायाभूत सुविधांसाठी मनपाला वर्षभरापूर्वी २६ कोटींचे व त्यानंतर पुन्हा दोन कोटींचे अनुदान प्राप्त झाले. तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या कार्यकाळात २६ कोटींतून होणार्या विकास कामांमधून तत्कालीन विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांना फक्त ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. भाजप-सेनेच्या विरोधाला झुगारून तत्कालीन सत्तापक्षाने २६ कोटींतून विकास कामांचे ६८0 प्रस्ताव तयार केले होते. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड व विस्कळीत होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला २६ कोटींतून ११ कोटी ८४ लाख निधी देण्याचा ठराव मंजूर केला.
सभागृहाने सुद्धा या प्रस्तावाला मंजुरी दिली. तेव्हापासून उर्वरित १४ कोटी १६ लाखांची कामे प्रलंबित होती. यामध्ये मनपातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलप्रदाय व विद्युत विभागाने सर्वसमावेशक विकास कामांचे प्रस्ताव सादर केले असता, या कामांना आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी मंजुरी दिली. एकूणच, आगामी दिवसात १५ कोटींतून १२ डांबरी रस्त्यांची दुरुस्ती, सहा सिमेंट रस्त्यांची निर्मिती तर १४ कोटी १६ लाखांतून सुद्धा विकास कामे पूर्ण केली जातील. मनपाच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विकास कामे मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.