अकोला मनपाचे दोन कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: January 2, 2015 01:31 IST2015-01-02T01:31:05+5:302015-01-02T01:31:05+5:30

कामचुकारपणा भोवला.

Akola municipal employees suspended | अकोला मनपाचे दोन कर्मचारी निलंबित

अकोला मनपाचे दोन कर्मचारी निलंबित

अकोला : शहरातील लघू व्यावसायिक, फेरीवाले यांच्याकडून दैनंदिन परवाना शुल्काची वसुली करण्यात कामचुकारपणा करणे बाजार विभागातील वसुली निरीक्षक दीपक शिरसाट यांना भोवले, तर कर्तव्यातील हलगर्जीपणा मनपाचे सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण यांच्या अंगलट आला. दोन्ही कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी बुधवारी जारी केले.
शहराच्या रस्त्यालगत विविध साहित्याची विक्री करणारे लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालक, भाजी विक्रेत्यांकडून मनपाच्या बाजार वसुली विभागाकडून दैनंदिन परवाना शुल्क वसूल केले जाते. शहरात किरकोळ व्यावसायिकांची वाढती संख्या व बाजार विभागाचे तोकडे आर्थिक उत्पन्न लक्षात घेता, प्रशासनाने परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर २0११ मध्ये अंमलात आणला. यामध्ये बाजारातील ओटे, जागेवर दुकान थाटणार्‍या व्यावसायिकांकडून दहा रुपये, तर हातगाडी, फेरीवाल्यांना पंधरा रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दैनंदिन परवाना शुल्काची वसुली करण्याची जबाबदारी असलेल्या दीपक शिरसाट यांनी वसुलीसाठी चक्क खासगी व्यक्तीची नियुक्ती केल्याची बाब उपमहापौर विनोद मापारी यांनी उघडकीस आणली. बाजार विभागाचे अधीक्षक हुंगे यांची दिशाभूल करीत संबंधित कर्मचारी मागील तीन वर्षांंंंपासून फक्त पाच रुपये, दहा रुपये याप्रमाणे लघू व्यावसायिकांकडून परवाना शुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले. प्रशासनाने लागू केलेल्या शुल्कवाढीपासून १ हजार ६0 दिवसांमध्ये प्रति पाच रुपयानुसार ८१ लाख ६२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा उपमहापौरांनी मांडला होता.
संबंधित महापालिका कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यानुषंगाने प्रशासनाने वसुली निरीक्षक दीपक शिरसाट यांना निलंबित केले. मानधनावरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी कामबंद केल्यानंतर काही कंत्राटदारांनी मनपा आवारात साहित्याची तोडफोड केली होती. त्यावेळी सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण कर्तव्यावर हजर नसल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्याची कारवाई प्रशासनाने केली.

Web Title: Akola municipal employees suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.