अकोला महापालिकेचे नवे आयुक्त अजय लहाने
By Admin | Updated: September 5, 2015 01:53 IST2015-09-05T01:53:55+5:302015-09-05T01:53:55+5:30
अधिका-यांच्या बदल्या; अमानकर महाबिजच्या व्यवस्थापकपदी.

अकोला महापालिकेचे नवे आयुक्त अजय लहाने
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती येथील तडफदार उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांना नियुक्त होण्याचे आदेश शुक्रवारी महसूल विभागाने जारी केले. येत्या सोमवारी अजय लहाने मनपात रुजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरातील रखडलेली विकास कामे निकाली काढण्यात मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे सपशेल अपयशी ठरले. ११ फेब्रुवारी रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार्या शेटे यांची अवघ्या सहा महिन्यातच शासनाने बदली केली. शेटे यांची ३१ ऑगस्ट रोजी कामठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाल्यामुळे आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सोपविण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी अवघ्या दोनच दिवसात मनपाच्या इत्थंभूत कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान, रिक्त आयुक्तपदावर अमरावती येथील उपजिल्हाधिकारी (वन जमाबंदी) अजय लहाने यांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. अखेर ४ सप्टेंबर रोजी मनपाच्या आयुक्तपदी अजय लहाने यांच्या नियुक्तीचे आदेश महसूल व वन विभागाने जारी केले. प्रशासकीय वतरुळात लहाने यांची अत्यंत शिस्तबद्ध आणि तडफदार अधिकारी म्हणून ओळख असल्यामुळे महापालिकेला ते नक्कीच वठणीवर आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अकोल्यात अडीच वर्ष होते 'डीएसओ'पदी कार्यरत
अजय लहाने यांनी मार्च २000 ते सप्टेंबर २00२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली होती. कर्तव्यात कसूर झाल्यास कारवाईचा दंडुका उगारण्यात ते हयगय करीत नसल्याचा अनुभव आहे.
*अनिल खंडागळेसह दोन उपजिल्हाधिका-यांची बदली
शासनामार्फत महसूल विभागातील अधिकार्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. त्यामध्ये अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) अनिल खंडागळे यांच्यासह दोन उपजिल्हाधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. नवे 'आरडीसी' म्हणून बुलडाण्याचे श्रीकांत देशपांडे तर वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) नवे महाव्यवस्थापक म्हणून येत आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची वाशिम येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून तर बाश्रीटाकळी येथील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी संदीप सानप यांची वाशिम येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे अकोल्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून व वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर अकोल्यातील महाबीजचे नवे महाव्यवस्थापक म्हणून येत आहेत.